राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. कोकण, घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रातील पावसाची स्थिती कशी असणार याबद्दलचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

मुंबई : राज्यात मान्सूनचा प्रभाव कायम आहे. आज 20 जुलै रोजी अनेक भागांत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांतील पावसाची स्थिती कशी राहणार याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. तसेच पुणे आणि सातारा घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

कोकणात मध्यम पावसाची शक्यता

कोकणात आजही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. पालघर आणि मुंबईमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

उत्तर महाराष्ट्रात जळगावसाठी वादळी पावसाचा इशारा

धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. घाटमाथा भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.

पश्चिम महाराष्ट्रात घाटमाथा भागावर हवामान विभागाची नजर

पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांत हलक्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. मात्र पुणे आणि सातारा घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागातील नागरिकांसह पर्यटकांनीही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज

छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. तर बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

विदर्भात सर्वत्र हलक्या सरींची शक्यता

विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह अधूनमधून पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

मुंबईतील पावसाची स्थिती

मुंबईत आज ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. आज सकाळपासून मरीन ड्राइव्हवर येथे ढगाळ वातावरणाची स्थिती आहे.

Scroll to load tweet…