मुंबई, ठाणे सारख्या ठिकाणी पावसाचा जोर ओसरला आहे. पण तरीही हवामान खात्याकडून राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबई : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा आणि सायक्लोनिक सर्क्युलेशनचा परिणाम महाराष्ट्रावर दिसून आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून अति मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली होती. मात्र आता पावसाचा जोर काहीसा ओसरला असून परिस्थिती हळूहळू पूर्ववत होत आहे. पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. तरीदेखील राज्यातील 8 जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
कोणत्या जिल्ह्यांसाठी अलर्ट?
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा आणि सातारा या जिल्ह्यांसाठी आज पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्या आणि परवा विदर्भात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढेल असा अंदाज आहे. 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे.
धरणं ओसंडून वाहू लागली
गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक धरणं भरून वाहू लागली आहेत. उजनी धरण 105 टक्क्यांपेक्षा अधिक भरले असून, धरणाचे 16 दरवाजे उघडून 1 लाख 50 हजार क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात आला. त्यामुळे भीमा नदीचं पात्र ओसंडून वाहू लागलं आहे.
पुरस्थितीमुळे वाहतूक विस्कळीत
गडचिरोली जिल्ह्यात तीन राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर इंद्रावती नदीच्या पुराचे पाणी आल्यानं मार्ग बंद झाला आहे. नालासोपाऱ्यात पावसामुळे पोलीस स्टेशनमध्ये गुडघाभर पाणी साचलं. अशा परिस्थितीत पोलिसांना काम सुरू ठेवावं लागत आहे.
विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात बारूळ गावातील बोरी नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि ग्रामस्थ जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. यामुळे गावकऱ्यांनी या पुलाची उंची वाढवण्याची मागणी केली आहे.


