Maharashtra Weather Update: महाराष्ट्रातील पावसाचे चित्र बदलत असून, हवामान विभागाने ११ ऑगस्टसाठी १० जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील पावसाचे चित्र आता हळूहळू बदलत आहे. काही भागांत जोरदार पावसाची सिरीज कमी होताना दिसत असली, तरी हवामान विभागाने 11 ऑगस्टसाठी राज्यातील 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी राज्यात पुन्हा एकदा पावसाची दस्तक होण्याची शक्यता आहे.

Scroll to load tweet…

कोकणात हलक्यापासून मध्यम पावसाची शक्यता

कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ढगांच्या गडगडाटासह काही भागांत पावसाच्या सरी येऊ शकतात, मात्र याठिकाणी सध्या कोणताही रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी केलेला नाही.

पश्चिम महाराष्ट्र: सोलापूरवर यलो अलर्टचा प्रभाव

पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि घाटमाथा परिसरात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. परंतु सोलापूर जिल्ह्याचा हवामानाचा मिजाज काहीसा 'उग्र' दिसत असून, वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सोलापूरसाठी यलो अलर्ट जारी केला गेला आहे.

मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट

छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. तर नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत वीज चमक आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवला गेला असून या तिन्ही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्रात तुलनेत स्थिरता

नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. मात्र उत्तर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्याला सध्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही.

विदर्भात वीज चमक व वाऱ्यांसह पावसाची शक्यता

नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांत वीज चमक, वादळी वारे आणि पावसाची शक्यता असल्यामुळे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, अकोला, अमरावती, वर्धा, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांत मात्र कोणताही पाऊस नोंदवलेला नाही आणि तिथे हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता आहे.

11 ऑगस्ट: हवामानात सुसाट बदल, नागरिकांनी खबरदारी घ्यावी

गेल्या तीन-चार दिवसांच्या तुलनेत 11 ऑगस्ट रोजी पावसाचा जोर तुलनेत कमी दिसतोय, मात्र हवामान विभागाने दिलेल्या यलो अलर्टनुसार राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये हवामान अस्थिर राहू शकते. विजेचा कडकडाट, वादळी वारे आणि पावसाच्या जोरामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

हवामानाचा बदललेला ट्रेंड पाहता, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पुन्हा सक्रीय होऊ शकतो. विशेषतः यलो अलर्ट दिलेल्या भागांमध्ये नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.