राज्यात 27 जुलै 2026 रोजीही पावसाची संततधार कायम राहण्याची शक्यता आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथे आणि काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर 27 जुलै रोजीही कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा परिसर तसेच काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय अनेक जिल्ह्यांसाठी पावसाच्या स्थितीमुळे अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईत पावसाची रिमझिम
मुंबई आणि उपनगरांमध्ये रविवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस आजही आहे. अनेक भागांत संततधार सुरू असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, देशभरातही मान्सून सक्रिय झाला आहे. पुढील 12 तासांत 18 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
कोकणात रायगड-रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट
कोकण विभागात पावसाचा प्रभाव कायम राहणार आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे, मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघरमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. किनारपट्टी भागातील नागरिकांनी आणि मच्छीमारांनी विशेष दक्षता घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यात यलो अलर्टसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. नाशिक शहर आणि अहिल्यानगरमध्येही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तसेच नाशिक घाटमाथा परिसरात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यांवर मुसळधार पावसाचा इशारा
पुणे आणि सातारा घाटमाथा परिसरासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे शहरात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस राहणार आहे. सांगली आणि सोलापूरमध्ये हलक्या स्वरूपाच्या सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मराठवाड्यात यलो अलर्ट; वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता आहे. यामुळे येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. धाराशिव, बीड आणि परभणी जिल्ह्यांतही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता कायम आहे.
पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम
हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात पुढील काही दिवस मान्सून सक्रिय राहणार आहे. कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. नदीकाठच्या परिसरातील नागरिक, प्रवासी आणि घाटमार्गाने प्रवास करणाऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


