- Home
- Maharashtra
- Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात गुरुवारी मुसळधार पावसाचा इशारा, विदर्भात ऑरेंज अलर्ट
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात गुरुवारी मुसळधार पावसाचा इशारा, विदर्भात ऑरेंज अलर्ट
Maharashtra Weather Alert: हवामान विभागाने 14 ऑगस्टला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे आगमन होण्याची शक्यता असून, भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार ते अति जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. 14 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असून, अनेक जिल्ह्यांना यलो व ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या pic.twitter.com/3kFYtcqklz
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 13, 2025
कोकणात जोरदार पावसाची शक्यता, सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये 14 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई व उपनगरात आकाश ढगाळ राहणार असून, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने कोकणासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात घाट भागांमध्ये यलो अलर्ट
पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रात पावसाची हलकी ते मध्यम शक्यता
अहिल्यानगर, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. धुळे, नंदुरबार आणि नाशिकच्या घाट विभागांमध्ये काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
मराठवाड्यात सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बीड व जालना जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
विदर्भात 14 ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढणार आहे. अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. संपूर्ण विदर्भात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
सावधगिरी बाळगा
या हवामान इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षितता नियम पाळावेत. नद्या, नाले आणि घाट परिसरात अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.

