Maharashtra : राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. पार्थ पवार, रुपाली पाटील-ठोंबरे, सुनेत्रा पवार आणि छगन भुजबळ यांची नावे यादीत नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Maharashtra : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांची ४० जणांची यादी जाहीर करण्यात आली आहे. जमीन खरेदी व्यवहारामुळे चर्चेत आलेले पार्थ पवार यांना यादीतून वगळण्यात आले असून, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर टीका करणाऱ्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनाही स्थान देण्यात आलेले नाही. या दोघांची गैरहजेरी दिवसभर चर्चेचा विषय राहिली.
सुनेत्रा पवार, दिलीप वळसे-पाटील यांनाही स्थान नाही
वगळण्यात आलेल्या इतर प्रमुख नावांमध्ये राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील आणि मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांचा समावेश आहे. नगरपरिषद आणि पंचायतीच्या निवडणुकांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून मतदान २ डिसेंबरला होणार आहे. अशा परिस्थितीत अनेक दिग्गज नेते प्रचाराच्या यादीत नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
छगन भुजबळांच्या प्रकृतीमुळे नाव वगळल्याचे स्पष्टीकरण
ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीत नसल्याने दिवसभर अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले. अखेर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की, भुजबळ यांच्यावर अलीकडेच शस्त्रक्रिया झाली असून ते अजून रुग्णालयात आहेत. त्यामुळे या निवडणुकांसाठी ते उपलब्ध नसतील; मात्र जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांसाठी ते प्रचारात सहभागी होऊ शकतील.
अजित पवारांसह ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर
जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे, अदिती तटकरे, इंद्रनील नाईक, नवाब मलिक, समीर भुजबळ यांच्यासह एकूण ४० जणांचा समावेश आहे. ही टीम आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळणार आहे.


