Nagpur : नागपूरच्या वाडी परिसरात १८ वर्षीय बारावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पेपर देऊन घरी परतल्यानंतर संध्याकाळी ती घरात एकटी असताना हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. 

Nagpur :  नागपूर शहरातील वाडी परिसरात एका १८ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. निकिता बनसोड (रा. खाडगाव रोड, वाडी) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती बारावीमध्ये शिक्षण घेत होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पेपरनंतर घरी परतली, संध्याकाळी घटना

मिळालेल्या माहितीनुसार, १६ फेब्रुवारी रोजी निकिताचा भौतिकशास्त्राचा पेपर होता. दुपारी सुमारे ३.३० वाजता ती पेपर देऊन घरी परतली. त्यावेळी घरात कोणीही नव्हते. सायंकाळी सुमारे ७ वाजता तिचा भाऊ आदित्य घरी आला तेव्हा ती सामान्य अवस्थेत होती. काही वेळ गप्पा मारल्यानंतर तो आईला आणण्यासाठी बाहेर गेला.

खोलीचा दरवाजा उघडताच धक्का

काही वेळानंतर आदित्य आईसह घरी परतला. त्यांनी निकिताच्या खोलीचा दरवाजा ठोठावला; मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने दरवाजा उघडून पाहिले असता ती खिडकीच्या ग्रीलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. कुटुंबीयांनी तातडीने तिला खाली उतरवून नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.

पोलिसांचा तपास सुरू

या प्रकरणी वाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल का उचलले, ती कोणत्याही तणावाखाली होती का, याचा तपास केला जात आहे. कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.