सार

राज्य सरकारी कर्मचारी येत्या 29 ऑगस्टपासून आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाणार आहेत. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यभरातील 17 लाख कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत.

मुंबई : राज्य सरकारी कर्मचारी येत्या 29 ऑगस्टपासून आपल्या विविध मागण्यांसाठी संपाचं हत्यार उपसणार आहेत. राज्य सरकारी कर्मचारी संघटना कृती समितीच्या आजच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. राज्यातील जवळपास 17 लाख कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होऊ शकते. विशेष म्हणजे पुढच्या महिन्यात गणेशोत्सव आहे. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा हा संप स्थगित करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारपुढे मोठं आव्हान असणार आहे.

राज्य सरकारी कर्मचारी येत्या 29 ऑगस्टपासून बेमुदत संपावर

महाराष्ट्रातील तब्बल 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारी कर्मचारी संघटना कृती समितीची रविवारी मुंबईत बैठक पार पडली आहे. या बैठकीत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या 29 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. राज्य सरकारी कर्मचारी संघटना कृती समितीचे मुख्य निमंत्रक विश्वास काटकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनप्रमाणे नवीन पेन्शन देण्याच्या मुद्द्यावर संप पुकारला आहे.

कृती समितीचे प्रमुख विश्वास काटकर यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. राज्य सरकारने तात्काळ नोटिफिकेशन काढण्याची मागणी कर्मचारी संघटनेकडून करण्यात आली आहे. तसेच नोटिफिकेशन निघत नाही तोपर्यंत संप सुरु ठेवण्याचा निर्धार संबंधित कर्मचारी संघटनेने केला आहे.

विश्वास काटकर नेमकं काय म्हणाले?

“महाराष्ट्रातील 17 लाख सरकारी, निम सरकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी 29 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जातील, असा निर्णय रविवारी मुंबई येथील समन्वय समितीच्या विस्तारीत सभेत झाला आहे. राज्य सरकारने पेन्शनबाबत जे आश्वासन दिलं ते अद्याप पाळण्यात आलेले नाही. सामाजिक आणि आर्थिक सुलक्षण म्हणून जुन्या पेन्शन प्रमाणे पेन्शन मिळेल, असं आश्वस्त करुन सुद्धा त्या संदर्भातील नोटीफिकेशन निघू शकलेले नाही. त्यामुळे सर्व कर्मचारी, शिक्षक हे चिंतेत आहेत”, असे विश्वास काटकर म्हणाले आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीआधी पुन्हा आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कोणते निर्णय किती वेळात घेतले जातील, याची साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळेच राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांची सहनशीलता संपलेली आहे. त्यामुळे त्यांनी 29 ऑगस्टपासून राज्यभरात बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे, अशी माहिती विश्वास काटकर यांनी दिली आहे.

आणखी वाचा :

शेतकऱ्यांच्या उत्पन्नऐवजी आत्महत्या दुप्पट, सत्ता बदलण्याची गरज : शरद पवार