महाराष्ट्रात पावसाचे असमान वितरण झाले असून काही भागात अतिवृष्टी तर काही ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला.

Maharashtra: महाराष्ट्रात पाऊस चांगल्या प्रकारे वाढत चालला आहे. पण ७ जुलैपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार राज्यात तब्बल ९९% पाऊस पडून गेला आहे. कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती या विभागांमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. पण अजूनही छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या भागांमध्ये चांगला पाऊस झाला नाही.

मराठवाड्यात पावसाची चिंता 

मराठवाड्यात अद्यापही चांगला पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीची चिंता सतावत आहे. येथील आठही जिल्ह्यांमध्ये १००% पर्यंत पाऊस झालेला नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरीच्या ९८% पाऊस झाला असून बीड जिल्ह्यात सर्वात कमी ४४% पाऊस झाला आहे. मराठवाड्यात चांगला पाऊस झाला नाही तर शेतीच नुकसान होण्याची शक्यता आहे.

गडचिरोलीला झाला चांगला पाऊस 

नागपूर विभागात गडचिरोली सोडून इतरत्र अजूनही पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात सरासरीच्या १२५% पाऊस झाला असून इतर पाच जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. वर्धा जिल्ह्यात सर्वात कमी ६६% पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यास शेतीच मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेतकऱ्यांनी काही ठिकाणी अजूनही पेरणी केली नसल्यामुळं अनिश्चितता कायम आहे.

सरासरी पावसाची सुरुवात चांगली झाली 

यावर्षी पावसाळा मे महिन्यातच सुरुवात झाली होती. पावसाने लवकर उघडीप न दिल्यामुळं पेरणीला उशीर झाला. जून महिन्यात २०७ मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो, त्याप्रमाणे जून महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत २०६ मिलीमीटरपर्यंत पाऊस झाला आहे. जुलै महिन्याची पावसाची सुरुवात चांगली झाली असून सात दिवसात सरासरी ७४.७ मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो.

तो प्रत्यक्षात ७४.४ मिलीमीटर झाला आहे. एकूण जून आणि जुलै या दोन महिन्यामध्ये चांगला पाऊस झाला आहे. राज्यात सरासरी २८२ मिलीमीटर पाऊस अपेक्षित असताना आतापर्यंत २८० मिलीमीटर पाऊस झाला आहे. राज्यात पावसाचे वितरण हे असमान असून त्यामुळं काही भागांमध्ये शेतकऱ्यांचे शेतीचे काम आटोपले असून काही ठिकाणी अजूनही पेरणी झालेली नाही.