मीरा रोड येथील हॉटेल मालकाने मराठीत संवाद साधला नाही म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी 'महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलावीच लागेल' असं म्हटलं आहे. 

मुंबई : मीरा रोड येथील एका हॉटेल मालकाला मराठीत न बोलल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला असून, त्यावर आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी थेट आणि स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं, "महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलावीच लागेल. ‘मराठी येत नाही’ असं सांगून कोणी वाचणार नाही. पण कायदा हातात घेणं योग्य नाही."

नेमकी घटना काय घडली?

मीरा रोडमधील एका हॉटेलमध्ये तिन्ही मनसे कार्यकर्ते गेले असता, तिथल्या मालकाने मराठीत संवाद साधण्यास अडथळा येत असल्याचं सांगितलं. मालकाने अत्यंत शांतपणे, "मराठी शिकवली तर मी बोलेन" असं सांगितलं. मात्र, यावर कार्यकर्ते संतापले आणि त्याच्याशी वाद घालत हिंदीतच ‘मराठी बोल’ असा दम देत त्याला मारहाण केली. हॉटेल मालकाच्या चेहऱ्यावर आणि कानांवर मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ स्थानिक पत्रकार सचिन गुप्ता यांनी पोस्ट केला.

योगेश कदम काय म्हणाले?

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं. "मराठी ही महाराष्ट्राची शान आहे. कोणालाही ती अवहेलना करता येणार नाही. मात्र कायदा हातात घेणं योग्य नाही. ज्यांनी मारहाण केली त्यांना आम्ही समज दिली आहे की अशा घटना घडल्यास पोलीसांत तक्रार करा. हिंसाचार हा मार्ग नाही." ते पुढे म्हणाले, "इतर भाषांचा अवमान करायचा नाही. पण जर कोणी मराठीचा अपमान करत असेल, तर तो आम्ही कधीही सहन करणार नाही."

Scroll to load tweet…

सोशल मीडियावर चर्चेचा विषय

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, अनेक युजर्सनी मनसे कार्यकर्त्यांची दुटप्पी भाषा आणि हिंसक वागणूक यावर टीका केली आहे. काही जण मराठीच्या आग्रहाचं समर्थन करत असले, तरी मारहाणीला विरोध करणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे.

कायद्यानुसार मार्ग शोधावा

या प्रकारानंतर प्रश्न उपस्थित होतो की, भाषेच्या आग्रहासाठी हिंसेचा मार्ग योग्य आहे का? गृहराज्यमंत्री यांच्या प्रतिक्रियेतून स्पष्ट आहे की सरकार मराठीच्या बाजूने ठाम आहे, मात्र कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर कृत्ये सहन केली जाणार नाहीत.