Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर वाढत असून, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकण किनारपट्टीवर ३.४ ते ३.९ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, सातारा घाट येथे ऑरेंज अलर्ट जारी केला

मुंबई: राज्यात पावसाचा जोर वाढत असून हवामान खात्याने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट आणि सातारा घाट या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने ही माहिती दिली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पावसाबरोबरच समुद्रातही स्थिती गंभीर बनत चालली आहे. भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना केंद्र (INCOIS) ने दिलेल्या माहितीनुसार, ३० जून २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजेपर्यंत कोकण किनारपट्टीवर ३.४ ते ३.९ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे लहान होड्यांनी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. मत्स्य व्यवसाय करणाऱ्या मासेमार बांधवांनी तसेच किनारपट्टी भागातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

Scroll to load tweet…

पावसामुळे डोंगर उतार व घाटमाथ्यांवर भूस्खलनाचा धोका निर्माण होऊ शकतो. प्रवाशांनी अनावश्यक प्रवास टाळावा, तसेच घाट मार्गांवर वाहनचालकांनी विशेष दक्षता घ्यावी, असेही प्रशासनाने सुचवले आहे. जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेता स्थानिक यंत्रणा सतर्क असून बचाव पथकं सज्ज ठेवण्यात आली आहेत.

कोकण व घाटमाथा परिसरात जूनअखेर मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. नागरिकांनी ऑफिशियल हवामान माहिती, स्थानिक प्रशासनाच्या सूचना व खबरदारीचे उपाय यांचे पालन करून सुरक्षित राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.