सार

महाविकास आघाडीने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांना दरमहा ₹3 हजार आणि कुटुंबांना ₹25 लाख आरोग्य विमा देण्याचे आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांना ₹3 लाख कर्जमाफी आणि बेरोजगार तरुणांना ₹4 हजार आर्थिक मदत देण्याची घोषणाही केली आहे.

निवडणुकीच्या कार्यकाळात प्रत्येक पक्ष त्यांचा जाहीरनामा आणि वचननामा जनतेपुढे मांडण्याचा प्रयत्न करत असतो. निवडणुकीनंतर सत्तेत आल्यावर या वचननाम्यानुसार काम करण्याचा प्रयत्न हा प्रत्येक पक्ष करत असतो. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर महाविकास आघाडीकडून आश्वासन देण्यात आले आहेत. यामध्ये पहिलं आश्वासन हे महालक्ष्मी योजनेचं आहे. या योजनेच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकार राज्यातील महिलांना दर महिन्याला प्रत्येकी 3 हजार रुपये आणि बसप्रवास मोफत करणार आहे. विशेष म्हणजे दुसरी घोषणा देखील तेवढीच मोठी आहे. राज्य सरकार प्रत्येक कुटुंबाला 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा देणार आहे तसेच मोफत औषधे देखील देणार आहे. या योजनेचं नाव कटुंब रक्ष योजना असं देण्यात आलं आहे.

महाविकास आघाडीने आश्वासनांचा पाडला पाऊस -

  • महाविकास आघाडीकडून राज्याच्या जनतेला तिसरी जी गॅरंटी देण्यात आली ती समानतेची हमी अशी देण्यात आली आहे. या माध्यामतून महाविकास आघाडी आपलं सरकार आल्यास राज्यात जातनिहाय जनगणना करणार आहे. तसेच राज्यातील 50 टक्के आरक्षण हटवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मविआने आश्वासन दिलं आहे.
  • शेतकऱ्यांसाठी देखील महाविकास आघाडीने मोठं आश्वासन दिलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आलं तर सर्व शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतची कर्जमाफी देऊ, असं मविआने जाहीर केलं आहे. तसेच शेतकऱ्यांना नियमित कर्जफेडीसाठी 50 हजार रुपये प्रोत्साहन म्हणून दिले जातील, असंही मोठं आश्वासन देण्यात आलं आहे.
  • विशेष म्हणजे महाविकास आघाडीने यावेळी बेरोजगार तरुणांसाठी देखील मोठी घोषणा केली आहे. राज्यातील बेरोजगार तरुणांना महाविकास आघाडीचं सरकार आल्यास दर महिन्याला 4 हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत केली जाईल, असं आश्वासन महाविकास आघाडीकडून देण्यात आलं आहे.