सार

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची फैरी झाली आहे. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा अजित पवार यांनी निषेध केला आहे.

विधानसभा निवडणुकीला कमी दिवस राहिले असून आता प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. आता सत्ताधारी आणि प्रतिस्पर्धी या दोघांमध्ये खालच्या पातळीवर टीका सुरु झाली आहे. आता महायुतीच्या सभेमध्ये एकमेकांवर चिखलफेक सुरु असून शरद पवार यांच्यावर सदाभाऊ खोत यांनी पातळी सोडून टीका केली. त्यामुळे त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत. 

अजित पवार यांनी टोचले कान - 
अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवरून सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात वैयक्तिक मतभेत असले तरी पवारांवर करण्यात आलेली टीका ही अजित पवार यांना आवडली नाही. त्यांनी एक्सवर पोस्ट करून याबद्दलची माहिती दिली आहे. 

काय म्हणाले अजित पवार  - 
अजित पवार यांनी म्हटले आहे की, "‘ ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही’.