सार
परळी मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे हे परत एकदा २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचे राजेसाहबे देशमुख हे उभे राहिले आहेत. या मतदारसंघातील अनेक व्हिडीओ आज व्हायरल झाले असून यामध्ये मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून दुसऱ्या पक्षातील कार्यकर्ते आणि नेत्यांना मारहाण होत असल्याचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये काय झाले? -
धनंजय मुंडे यांच्या नावाने जयजयकारच्या घोषणा दिल्या जात आहेत. त्याच ठिकाणी एक लोकप्रतिनिधी आला असून त्याला मुंडे यांच्या समर्थकांकडून मारहाण करण्यात येत आहे. माधव जाधव असे मारहाण करण्यात आलेल्या नेत्याचे नाव असून यासंबंधीचे ट्विट खासदार बजरंग सोनावणे यांनी केलं आहे. त्यांनी यामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी ही मारहाण केल्याचं म्हटलं आहे.
परळी विधानसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या गावांमध्ये घटना घडत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकारच्या घटनांमुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. मतदान प्रक्रियेत अनेक ठिकाणी छेडछाड करण्यात आल्याचे आरोप करण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या निवडणुकीतील घटनांमुळे लोकांमध्ये विश्वासार्हता किती राहते याकडे कोणाचेही लक्ष राहिलेलं नाही.