महाराष्ट्र सरकारने व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासंबंधित नियम येत्या 16 ऑगस्ट 2026 पासून लागू होणार आहे.

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाकडून ओला, उबर आणि बस अशा व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यवहारिक मराठी भाषा येणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 मधील काही नियमांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामुळे येत्या 16 ऑगस्ट 2026 पासून या नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात याबाबत माहिती दिली.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

16 ऑगस्टपासून मराठी बंधनकारक

परिवहन विभागाने महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 मधील नियम 4, 22, 78 आणि 85 मध्ये आवश्यक बदल केले आहेत. या सुधारणांनुसार व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांना राज्यातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आवश्यक तेवढे व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य असणार आहे. या संदर्भातील अधिकृत अधिसूचना 8 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

निर्णयामागील उद्देश काय?

प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, महाराष्ट्रात रोजगारासाठी देशाच्या विविध भागांतून नागरिक येतात. राज्याकडून त्यांचे स्वागत केले जाते. पण प्रवाशांसोबत संवाद साधण्याऐवढी मराठी भाषा येणे आवश्यक आहे. हा निर्णय कोणत्याही भाषेविरोधात नसल्याचेही प्रताप सरनाईक यांनी म्हटले.

प्रवासी सुरक्षेला मिळणार बळ

चालक आणि प्रवासी यांच्यातील संवाद अधिक स्पष्ट झाल्यास गैरसमज टाळता येतील. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळण्यास मदत होईल. याशिवाय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक मजबूत होईल, असे सरनाईक यांनी नमूद केले.

राज्यभर प्रशिक्षण मोहिमेची अंमलबजावणी

या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन विभागाने गेल्या काही महिन्यांपासून राज्यव्यापी प्रशिक्षण मोहीम सुरू केली आहे. कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ आणि राज्याच्या मराठी भाषा विभागाच्या सहकार्याने हजारो अनुभवी शिक्षकांची टीम तयार करण्यात आली आहे. विविध प्रादेशिक परिवहन कार्यालये आणि प्रशिक्षण केंद्रांमध्ये चालकांसाठी विशेष प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहेत.

विशेष अभ्यासक्रमाची तयारी

चालकांसाठी तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमात प्रवाशांशी नम्र संवाद, दिशा व ठिकाणांची माहिती, भाडे, आपत्कालीन प्रसंगासह महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांशी प्रभावी संवाद साधण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मराठी शिकणे अधिक सोपे आणि उपयुक्त ठरावे यासाठी पुस्तिका आणि विशेष प्रशिक्षण साहित्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

मराठीचा सन्मान आणि सार्वजनिक सेवेचा दर्जा

“महाराष्ट्रात रोजगार करणाऱ्या प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगावा. तसेच महाराष्ट्राच्या मातृभाषेलाही स्वीकारावे,” असे आवाहन प्रताप सरनाईक यांनी केले. या निर्णयामुळे भाषिक स्वाभिमान, प्रवाशांची सुरक्षा आणि सार्वजनिक सेवेचा दर्जा यांचा समन्वय साधला जाईल. तसेच वाहन चालक, वाहन मालक, परिवहन संघटना आणि नागरिकांनी या उपक्रमात सकारात्मक सहभाग नोंदवावा, असे आवाहनही सरनाईक यांनी केले आहे.

या प्रकरणात आधी काय घडले?

महाराष्ट्रात व्यावसायिक वाहन चालकांना मराठी भाषा अवगत असावी, या मुद्द्यावर गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू होती. अनेक ठिकाणी प्रवासी आणि चालक यांच्यात भाषेच्या अडचणींमुळे संवादाचा प्रश्न निर्माण होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. विशेषतः रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-आधारित कॅब सेवांमध्ये राज्याबाहेरील चालकांची संख्या वाढल्याने मराठी भाषेच्या वापराबाबतचा मुद्दा ऐरणीवर आला होता.

याच पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यावसायिक चालकांना व्यवहारिक मराठीचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर परिवहन विभाग, मराठी भाषा विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या सहकार्याने राज्यभर प्रशिक्षण मोहीम राबविण्यात आली. तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 मधील आवश्यक नियमांमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यानंतर आता 8 जुलै 2026 रोजी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.