Maharashtra : कार्तिकी एकादशीनिमित्त अकोल्यात आयोजित भजन कार्यक्रमात राष्ट्रवादी (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी आगामी आषाढी एकादशीला अजित पवारांनी मुख्यमंत्री म्हणून शासकीय महापूजा करावी अशी विठ्ठलाला प्रार्थना केली. 

Maharashtra : कार्तिकी एकादशीनिमित्त अकोल्यात आमदार अमोल मिटकरी यांच्या घरी भजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी संत नामदेवांचा अभंग गात, मिटकरी म्हणाले, “अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, हे आमच्यासाठी विठ्ठलाचं राज्य असेल.” आगामी आषाढी एकादशीला अजित पवारांनी सपत्नीक शासकीय महापूजा करावी, असे त्यांनी स्पष्टपणे विठ्ठलाला साकडं घातलं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची ही भावनिक मागणी असल्याचेही ते म्हणाले.

“फडणवीसांनी केंद्रात मोठ्या पदावर जावं”

याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “2029 पर्यंत राज्यातच राहणार” असे संकेत दिले होते. मात्र, त्यावर प्रतिक्रिया देताना मिटकरी म्हणाले, “अजितदादा मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीसांनी केंद्रात मोठ्या पदावर जावं.” बिहार निवडणुकीतील फडणवीसांच्या कामगिरीचा उल्लेख करत त्यांनी त्यांची लोकप्रियता अधोरेखित केली.

महायुतीत नवा वाद?

राज्यात मुख्यमंत्रीपदाबाबत सध्या कोणतीही चर्चा नसताना मिटकरींचे हे वक्तव्य समोर आले. त्यामुळे महायुतीत नवा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजकीय वर्तुळात या विधानाची जोरदार चर्चा सुरु झाली असून, आगामी राजकीय समीकरणांना सुरुवात होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी, भाजप शिंदे व अजित पवारांना “कुबड्या” म्हणून संबोधत टीका केली होती. त्यावर पलटवार करत मिटकरी म्हणाले, “रोहित पवारांना महायुतीच्या मांडीवर बसायची घाई झाली आहे.” ‘घरी नाही दाणा, तरी बाजीराव म्हणा’ अशी खोचक टीका त्यांनी केली. “तुमच्या पक्षाचे दुकान किती राहिले ते पाहा, दुसऱ्यांच्या घरात डोकावू नका,” असा सल्लाही त्यांनी दिला.