Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत जुलै महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर हा हप्ता वितरित केला जाईल. 

मुंबई : राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे! 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा पुढील हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर मिळणार हप्ता

मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला या योजनेचा हप्ता वितरित करण्यास सुरुवात होईल. पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात कालपासूनच हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी रक्षाबंधनाच्या निमित्ताने सरकारनं दोन महिन्यांचा हप्ता एकत्र दिला होता, त्यामुळे महिलांना ३ हजार रुपये मिळाले होते. मात्र, या वर्षी एकच हप्ता जमा होणार आहे.

बनावट लाभार्थींवर होणार कारवाई

या योजनेचा गैरप्रकारे लाभ घेणाऱ्यांवर सरकार आता कठोर कारवाई करणार आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, काही बनावट लाभार्थी समोर आले आहेत. पुढील १५ दिवसांत या आकडेवारीची सखोल तपासणी केली जाईल. जर कोणत्याही पुरुषाने किंवा अपात्र व्यक्तीने या योजनेचा लाभ घेतल्याचे निष्पन्न झाल्यास, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, अशी चेतावणी तटकरे यांनी दिली.

जुलै महिन्याचा सन्मान निधी वितरित

मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहे की, जुलै महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात हा सन्मान निधी लवकरच जमा होईल. जुलै २०२४ पासून सुरू झालेल्या या योजनेचा हा १२ वा हप्ता असणार आहे.