Kunal Patil News : उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कुणाल पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी भाजप हे योग्य व्यासपीठ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुंबई : उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि धुळे जिल्ह्यातील आमदार कुणाल पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेसमध्ये तीन पिढ्या कार्यरत असतानाही आता त्यांनी आपला राजकीय प्रवास भाजपात सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
"जनतेशी काँग्रेसचा कनेक्ट संपतोय" : कुणाल पाटील
कुणाल पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, "काँग्रेसचा थेट जनतेशी असलेला संवाद कमी होत चालला आहे. उत्तर महाराष्ट्र काँग्रेसचा बालेकिल्ला असतानाही पक्षाने या भागाकडे दुर्लक्ष केलं. आमच्याकडे विकासाचा प्रचंड अनुशेष आहे आणि तो भरून काढण्यासाठी भाजप हे योग्य व्यासपीठ आहे," असं त्यांनी स्पष्ट केलं.
"विकासासाठी भाजपात प्रवेश", भाजप सरकारची कार्यपद्धती भावली
कुणाल पाटील म्हणाले, "२०१४ मध्ये मोदी लाट असूनही मी काँग्रेसकडून निवडणूक जिंकली होती. पण आज भाजपने देशात आणि राज्यात विकासाचं जे वातावरण निर्माण केलं आहे, ते आमच्या भागासाठी आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या भागातील प्रलंबित प्रश्नांवर लक्ष दिलं आहे. त्यामुळे आमच्याच कार्यकर्त्यांमध्ये भाजपबद्दल सकारात्मक भावना तयार झाली आहे."
तीन पिढ्यांचा काँग्रेस प्रवास, पण आता वेगळा मार्ग
कुणाल पाटील यांचे आजोबा काँग्रेसकडून खासदार होते, तर वडील मंत्री होते. त्यांनी आजवर काँग्रेस विचारधारेप्रती निष्ठा ठेवली. मात्र आता पक्षाकडून अपेक्षित दिशा न मिळाल्यामुळे त्यांनी "विकासासाठी पक्षबदल" करण्याचा निर्णय घेतला आहे.
फडणवीस यांचा संकेत, "विकासाची भावना असल्यास आमचं स्वागत!"
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं की, "भाजपमध्ये येणारे लोक कोणत्याही पक्षावर विश्वास नसल्यामुळे येत असतील, तर आम्ही त्यांचं स्वागत करणार. आम्हाला पक्षाचा विस्तार करायचा आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येणं आमचं उद्दिष्ट आहे."
काँग्रेसची टीका, "भाजप ही चेटकीण पक्ष!"
दुसरीकडे, काँग्रेसकडून कुणाल पाटील यांच्या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. "भाजप ही चेटकीण आहे, जी काँग्रेसच्या नेत्यांना गिळते आहे. कुणाल पाटील यांनी आत्मघातकी निर्णय घेऊ नये," अशी घणाघाती टीका काँग्रेसच्या गोटातून करण्यात आली.
काँग्रेसला उत्तर महाराष्ट्रात मोठा धक्का, भाजपचा विस्तार वेगात
उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेससाठी ही घटना राजकीय दृष्टिकोनातून मोठा झटका आहे. तीन पिढ्यांची निष्ठा भाजपच्या विकासाच्या अजेंड्यासमोर झुकली आहे, हे काँग्रेससाठी चिंतेचं कारण आहे.


