Kolhapur : कोल्हापूर शहरात बिबट्याचा दिवसाढवळ्या वावर सुरू असून, विवेकानंद कॉलेज परिसरात एका पोलिसावर हल्ला झाला आहे. सुदैवाने मोठा अनर्थ टळला, पण नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी मोहिम सुरू केली आहे.

Kolhapur : कोल्हापूर शहरात सध्या बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वूडलँड हॉटेल, बीएसएनएल कार्यालय आणि महावितरणाच्या कार्यालयात बिबट्याचा (Kolhapur Leopard Attack) वावर दिसून आला आहे. या भागांमध्ये नागरिकांवर हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या असून त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसाढवळ्या बिबट्या मानवी वस्तीत फिरताना दिसल्याने कोल्हापूरकरांची तारांबळ उडाली आहे. याबाबतचे अनेक धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

विवेकानंद कॉलेज परिसरात पोलिसावर हल्ला

कोल्हापूरमधील विवेकानंद कॉलेज परिसरात बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच वनविभाग आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न सुरू असतानाच, चवथाळलेल्या बिबट्याने एका पोलिसावर जीवघेणा हल्ला केला. उपस्थित नागरिक आणि इतर पोलिसांनी आरडाओरडा केल्यामुळे बिबट्या घाबरून पळून गेला. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला असून शहरात पुन्हा एकदा वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेबाबत चर्चा रंगली आहे.

हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

घटनेदरम्यान बिबट्या एका घराच्या अरुंद भागात शिरला होता. वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी त्याला बाहेर हाकलण्याचा प्रयत्न करत असतानाच बिबट्या अचानक पोलिसांवर झेपावला. काही पोलीस जीव वाचवण्यासाठी पळाले, पण एका पोलिसाला बिबट्याने पकडून चवथाळले. सुदैवाने लोकांच्या आरडाओरड्यामुळे बिबट्या पळून गेला, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. जखमी पोलिसाला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

नागरिकांमध्ये भीती, वनविभागावर संताप

या घटनेनंतर कोल्हापूर शहरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बिबट्याच्या सततच्या वावरामुळे अनेकांनी घराबाहेर जाणं टाळलं आहे. स्थानिक रहिवाशांनी वनविभागाकडे तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. वनविभागाच्या टीमकडून सध्या सापळा लावून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.