Alandi Kartiki Yatra 2025: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त 12 ते 20 नोव्हेंबर 2025 दरम्यान होणाऱ्या आळंदी कार्तिकी यात्रेसाठी वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.
पुणे: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही आळंदीमध्ये कार्तिकी यात्रेचं मंगल वातावरण रंगणार आहे. 12 ते 20 नोव्हेंबर 2025 या कालावधीत होणाऱ्या या यात्रेसाठी लाखो भाविक आळंदीमध्ये दाखल होणार असल्याने पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने वाहतुकीत महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. भाविक आणि नागरिकांनी हे बदल लक्षात घेऊन प्रवास नियोजन करणे अत्यावश्यक आहे.
वाहतुकीतील मोठे बदल
या वर्षीची कार्तिकी यात्रा 12 ते 20 नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. त्यापैकी 15 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आणि 17 नोव्हेंबर रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा होणार आहे. या दोन्ही दिवशी महाराष्ट्रभरातून भाविकांचा प्रचंड ओघ अपेक्षित असल्याने वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही मार्गांवर जड व अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.
या मार्गांवर जड वाहनांना बंदी
12 ते 20 नोव्हेंबर दरम्यान अत्यावश्यक सेवा व दिंडीतील वाहनांशिवाय इतर सर्व जड अवजड वाहनांना खालील मार्गांवर प्रवेशबंदी असेल.
मोशी चौक
भारतमाता चौक
चिंबळी फाटा
आळंदी फाटा
माजगाव फाटा
भोसे फाटा
चाकण–वडगाव घेणंद मार्ग
मरकळ मार्ग
पुणे–दिघी मॅगझीन चौक मार्ग
या वाहनांसाठी प्रशासनाने जयगणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक, भोसरी चौक–मॅगझीन चौक, कोयाळी कमान, कोयाळी–मरकळगाव मार्ग हे पर्यायी मार्ग सुचवले आहेत.
आळंदी शहरात प्रवेशबंदी
यात्रेदरम्यान सर्वसाधारण वाहनांना आळंदी शहरात प्रवेश बंद राहील. फक्त दिंडीतील वाहने आणि अत्यावश्यक सेवांची वाहने यांना प्रवेश दिला जाणार आहे.
खालील मार्ग बंद राहतील
पुणे–आळंदी
मोशी–आळंदी
चिंबळी–आळंदी
चाकण (आळंदी फाटा)–आळंदी
वडगाव घेणंद–आळंदी
मरकळ–आळंदी
पार्किंगची विशेष व्यवस्था
वडगाव घेणंद–शेल पिंपळगाव मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी : मुक्ताई मंगल कार्यालयाजवळ 25 एकर पार्किंग क्षेत्र उपलब्ध.
वडगावकडून येणाऱ्यांसाठी : वडगाव चौकाजवळील नगरपरिषद पार्किंग वापरता येईल.
बससेवांसाठी नवे थांबे
आळंदीहून निघणाऱ्या एस.टी. आणि पीएमपीएमएल बससेवांसाठी प्रशासनाने खालील ठिकाणी थांबे निश्चित केले आहेत.
मुख्य बसस्थानक: योगिराज चौक
देहूगाव दिशेच्या बस: डुडुळगाव जकातनाका
पुणे दिशेच्या बस: चऱ्होली फाटा
वाघोली व शिक्रापूर दिशेच्या बस: धानोरे फाटा
चाकण दिशेच्या बस: इंद्रायणी हॉस्पिटल परिसर
शेलपिंपळगाव व नगर दिशेच्या बस: विश्रांतवड–वडगाव रोड
भाविकांसाठी सूचना
प्रशासनाकडून सर्व भाविकांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी अधिकृत सूचना व दिशानिर्देशांचे पालन करावे, सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करावा आणि शक्यतो खासगी वाहनांनी प्रवास टाळावा.
विठ्ठलनामात न्हाऊन निघेल आळंदी!
आळंदीच्या या पवित्र कार्तिकी यात्रेत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीस्थळावर विठ्ठलनामाचा अखंड गजर होणार आहे. भक्तिभाव, अनुशासन आणि संयम यांचा संगम असलेली ही यात्रा सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.


