बदलापूर रेल रोकोचे राजकारण, लाडकी बहीण योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न?

| Published : Aug 22 2024, 05:27 PM IST / Updated: Aug 22 2024, 05:28 PM IST

CM Eknath Shinde

सार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूर येथील रेल रोको आंदोलनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. लाडकी बहीण योजनेच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. या योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूर येथील झालेल्या आंदोलनावर गुरुवारी प्रतिक्रिया दिली आहे. एखादी वाईट घटना घडल्यावर लोक स्वयंस्फूर्तीने आंदोलन करतात हे माहीत आहे. पण बदलापूरच्या आंदोलनात लाडकी बहीण योजनेच्या विरोधातील पोस्टर्स आलेच कसे? केवळ लाडकी बहीण योजना बदनाम करण्यासाठीच रेल्वे रोको करण्यात आला होता का?, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते गुरुवारी कोल्हापूर येथे आले असता मीडियाशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा सवाल उपस्थित केला आहे.

'बदलापूरमध्ये लाडकी बहीण योजनेला बदनाम करण्यासाठी केले रेल रोको आंदोलन'

आमच्या बहिणींना आधार देण्याचा हा कार्यक्रम असून या कार्यक्रमाला बहिणी स्वत: उपस्थित राहत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकवणारी योजना आहे. या योजनेला खोडा घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. बदलापुरातील आंदोलनाची पार्श्वभूमी पाहा. एखादे आंदोलन स्वयंस्फूर्तीने होते. पण बदलापूरच्या आंदोलनात लाडकी बहीण योजनेच्या विरोधातील बॅनर्स आले. योजनेला बदनाम करण्यासाठी रेल रोको केला. सात आठ तास लोकांना वेठीस धरणं हे कोणते राजकारण आहे? असा संतप्त सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

'आरोपीला 2 महिन्यात फाशीची शिक्षा झाली याचे मी जजमेंट वाचून दाखवलं'

कोर्टाने एका प्रकरणात आरोपीला दोन महिन्यात फाशीची शिक्षा झाली असे मी म्हणालो होतो. ते म्हणतात कुठे फाशी झाली? मी पुणे सत्र न्यायालयाचे जजमेंट आताच दाखवले आहे. विरोधकांचे काहीही बोलायचे सुरू आहे. खोटं बोलायचं ही विरोधकांची वृत्ती आहे. त्यांच्या या वृत्तीला बहिणी त्यांना सडेतोड उत्तर देतील, असंही मुख्यमंत्री म्हणाले. कोल्हापुरात खंडपीठ करण्याची अनेक वर्षाची मागणी आहे. 15 ऑगस्टच्या कार्यक्रमावेळी मुख्यन्यायाधीशांशी या संदर्भात चर्चा झाली आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.

'कोल्हापुरातील तरुणीच्या हत्या प्रकरणाच्या खोलाशी जाऊ'

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मीडियाशी संवाद साधला. कोल्हापूरमध्ये एका तरुणीची हत्या झाली आहे. त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. बिहारमधून हे कुटुंब आले होते. बुधवारी दुपारी त्या पीडितेच्या काकांनी मारल्यामुळे ती घराबाहेर पडली. ती घरी आलीच नसल्याने तिच्या घरच्यांनी रात्री 10 वाजता पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी तिचा शोध घेतला. सकाळी तिचा मृतदेह सापडला असून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता आहे. त्याबाबत पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे. काही संशयितांना अटक केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

आणखी वाचा :

बदलापूर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा पोलिसांना दणका, शाळा प्रशासनावरही सवाल