- Home
- Maharashtra
- Kolhapur Diwali Special Trains : कोल्हापुरकरांसाठी दिवाळी गिफ्ट, तीन विशेष रेल्वे गाड्यांद्वारे सोयीस्कर प्रवासाची सुविधा!
Kolhapur Diwali Special Trains : कोल्हापुरकरांसाठी दिवाळी गिफ्ट, तीन विशेष रेल्वे गाड्यांद्वारे सोयीस्कर प्रवासाची सुविधा!
Kolhapur Diwali Special Trains : दिवाळीच्या सुट्टीत कोल्हापूरहून तीन विशेष गाड्या धावणार आहेत. मध्य रेल्वेने एकूण 40 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला असून, यामध्ये कोल्हापूरहून मुंबई, कलबुर्गी आणि कटिहारसाठी गाड्यांचा समावेश आहे.

कोल्हापूर : यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीत कोल्हापुरकरांना मध्य रेल्वेने दिलंय एक मोठं गिफ्ट! सणासुदीच्या काळात विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आलेल्या असून, या वेळी कोल्हापुरातून तीन विशेष गाड्या धावणार आहेत. या गाड्यांच्या माध्यमातून प्रवाशांना सोयीस्कर आणि आरामदायक प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
मध्य रेल्वेकडून 40 विशेष गाड्यांची योजना
मध्य रेल्वेने यंदाच्या दिवाळीच्या सणासाठी एकूण 40 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये तीन गाड्या कोल्हापूरहून सुरू होणार आहेत, ज्यामुळे कोल्हापुरकरांना मुंबई, कलबुर्गी, आणि कटिहार अशा विविध ठिकाणी सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
कोल्हापूर-कटीहार मार्गावर विशेष ट्रेन
मध्य रेल्वेने कोल्हापूर, मिरज आणि सांगली मार्गे बिहारमधील कटिहारसाठी एक विशेष ट्रेन सुरू केली आहे. ही गाडी दर रविवारी सकाळी 09:35 वाजता कोल्हापूरहून सुटेल, आणि मंगळवारी सकाळी 06:10 वाजता कटिहारला पोहोचेल. याच गाडीच्या परत फेरीची वेळ मंगळवारी संध्याकाळी 06:10 वाजता कटिहारहून सुटून गुरुवारी दुपारी 03:35 वाजता कोल्हापुरात पोहोचेल.
कोल्हापूर-मुंबई मार्गावर साप्ताहिक ट्रेन
दुसरी विशेष ट्रेन कोल्हापूर-मुंबई मार्गावर धावणार आहे, जी साप्ताहिक असेल. ही ट्रेन दर बुधवारी रात्री 10:00 वाजता कोल्हापूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 01:30 वाजता मुंबईत पोहोचेल. मुंबईहून ही ट्रेन दर गुरुवारी दुपारी 02:30 वाजता सुटून, शुक्रवारी पहाटे 04:20 वाजता कोल्हापुरात दाखल होईल.
कोल्हापूर-कलबुर्गी मार्गावर विशेष सेवा
तिसरी विशेष ट्रेन कोल्हापूर-कलबुर्गी मार्गावर धावणार आहे, जी शुक्रवार वगळता आठवड्यातील इतर दिवस चालवली जाईल. कोल्हापूरातून सकाळी 06:10 वाजता सुटणारी ही ट्रेन दुपारी 04:10 वाजता कलबुर्गी पोहोचेल. सायंकाळी 06:10 वाजता कलबुर्गीतून सुटणारी ट्रेन दुसऱ्या दिवशी पहाटे 05:40 वाजता कोल्हापुरात पोहोचेल.
सणासुदीच्या काळात रेल्वे सेवेचा विस्तार
शारदीय नवरात्र, दसरा, दिवाळी आणि छटपूजा यांसारख्या मोठ्या सणांच्या काळात अनेक लोक आपल्या मूळ गावी जात असतात, आणि त्यात रेल्वे प्रवाशांची संख्या वाढते. यामुळे तिकीट न मिळाल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या समस्येचा विचार करून, पश्चिम रेल्वेने देखील चार विशेष गाड्यांच्या फेऱ्यांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.

