Maratha Reservation : मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या विजय घोगरे यांचे जे.जे. रुग्णालयात निधन झाले. 

मुंबई : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाला दुर्दैवी वळण लागले आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या विजय घोगरे (वय ३२) या तरुण कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. विजय हा लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव येथील रहिवासी होता. या घटनेमुळे संपूर्ण आंदोलकांमध्ये शोककळा पसरली आहे.

जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून लाखो मराठा बांधव मुंबईतील आझाद मैदानावर जमले आहेत. विजय घोगरे देखील याच आंदोलनाचा भाग होते. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना तातडीने जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

आंदोलन सुरूच, जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम

यापूर्वी, मुंबईतील आंदोलन सुरू होण्याआधीच जुन्नरजवळ सतीश देशमुख या मराठा आंदोलकाचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. अशा दोन दुःखद घटना घडल्या असल्या तरी, मनोज जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम आहेत.

राज्य सरकारचे शिष्टमंडळ त्यांना भेटून वेळ देण्याची मागणी करत आहे, पण जरांगे यांनी ती फेटाळली आहे. 'मराठा समाजाला कुणबी घोषित केल्याशिवाय मी हटणार नाही. सरकारने आदेशाची अंमलबजावणी करावी. मराठवाड्यातील १ लाख २३ हजार कुणबी नोंदी कुठे गेल्या? शिंदे समितीने १३ महिने अभ्यास केला, आता अहवाल द्या आणि उद्या सकाळपर्यंत मराठवाड्यातील मराठा-कुणबी, असा निर्णय जाहीर करून प्रमाणपत्रे द्या', अशी त्यांची मागणी आहे. या दुर्दैवी घटनांनंतरही जरांगे आणि आंदोलकांचा निर्धार अधिकच दृढ झाल्याचे दिसून येते.