Pune Rave Party : पुण्यातील खराडी येथे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना कथित रेव्ह पार्टीतून ताब्यात घेण्यात आले. वैद्यकीय अहवालात दोघांच्या रक्तात अल्कोहोल आढळले, मात्र ड्रग्जचे सेवन झाल्याचे आढळले नाही.
पुणे : गेल्या शनिवारी मध्यरात्री पुण्यातील खराडी परिसरात पुणे पोलिसांनी केलेल्या एका मोठ्या कारवाईने राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली. एका उच्चभ्रू सोसायटीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या कथित रेव्ह पार्टीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह एकूण सात जणांना ताब्यात घेण्यात आले, ज्यात दोन तरुणींचाही समावेश होता. छापेमारीत घटनास्थळी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ, हुक्का साहित्य आणि मद्य आढळल्याची माहिती समोर आली.
नेमका काय आहे वैद्यकीय अहवाल?
या घटनेनंतर सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला होता की, खरंच या पार्टीत अमली पदार्थांचा वापर झाला होता का? आणि एकनाथ खडसे यांच्या जावयाने ड्रग्जचे सेवन केले होते का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्व सात आरोपींची तातडीने वैद्यकीय चाचणी केली. आता या चाचणीचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे.
या अहवालानुसार, सातपैकी फक्त दोघांच्या रक्तात अल्कोहोल (दारू) आढळले आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे, सातपैकी कुणीही ड्रग्जचे सेवन केल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आलेले नाही. त्यामुळे, ही खरंच रेव्ह पार्टी होती की केवळ मद्यपान पार्टी, याबाबत आता संशय निर्माण होत आहे. सध्या, सर्व आरोपींचे रक्त आणि लघवीचे नमुने पुढील सखोल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
मध्यरात्री नेमके काय घडले?
शनिवारी रात्री उशिरा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला खराडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत रेव्ह पार्टी सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित फ्लॅटवर छापा टाकला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच त्यांना तिथे अमली पदार्थ, हुक्का आणि मद्याचे सेवन सुरू असल्याचे निदर्शनास आले. खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये 'हाऊस पार्टी'च्या नावाखाली हा सगळा प्रकार सुरू होता. विशेष म्हणजे, ज्या रुममध्ये ही पार्टी आयोजित करण्यात आली होती, ती खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या नावावर बुक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण घटनेचा तपास पुणे पोलीस सध्या करत आहेत. पुढील तपासात आणि सविस्तर अहवालानंतरच या पार्टीचे खरे स्वरूप समोर येईल, अशी अपेक्षा आहे.


