- Home
- Maharashtra
- Kartiki Ekadashi 2025: विठ्ठलभक्तांसाठी आनंदवार्ता! कार्तिकी एकादशीला पंढरपूर मंदिर २४ तास खुले, अखंड दर्शनाची सुवर्णसंधी!
Kartiki Ekadashi 2025: विठ्ठलभक्तांसाठी आनंदवार्ता! कार्तिकी एकादशीला पंढरपूर मंदिर २४ तास खुले, अखंड दर्शनाची सुवर्णसंधी!
Kartiki Ekadashi 2025: कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने २६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर या काळात २४ तास दर्शन खुले ठेवण्याचा निर्णय घेतला. या काळात व्हीआयपी दर्शन बंद राहणार असून भक्तांना अखंड दर्शनाचा लाभ घेता येणारय.

पंढरपूरमध्ये विठुरायाचे दर्शन आता २४ तास खुले
Kartiki Ekadashi 2025 News: यंदाच्या कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून लाखो विठ्ठलभक्त पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत. भाविकांना विठुरायाचे दर्शन अधिक सोयीस्कर आणि जलद व्हावे यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने मोठा निर्णय घेतला आहे. आता २६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत मंदिराचे दर्शन २४ तास सुरू राहणार आहे!
हा निर्णय मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी जाहीर केला असून, यामुळे लाखो भक्तांना अखंड दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
परंपरा कायम ठेवत नवा निर्णय
कार्तिकी एकादशी यात्रेच्या काळात श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची विधिवत पूजा झाल्यानंतर श्रींचा पलंग काढला जाईल. त्यामुळे या काळात काकड आरती, धूपारती, पोशाख, शेजारती आणि राजोपचार बंद राहतील. मात्र, नित्यपूजा, गंधाक्षता आणि महानैवेद्य हे राजोपचार नेहमीप्रमाणेच पार पाडले जातील.
मंदिर समितीच्या माहितीनुसार, या काळात भक्तांना २४ तास मुखदर्शन आणि २२ तास १५ मिनिटे पदस्पर्शदर्शन घेता येईल. दर्शन रांगेत होणारी गर्दी लक्षात घेऊन रांगेचे व्यवस्थापन, मार्गदर्शन आणि सुरक्षा व्यवस्था यावर विशेष भर दिला आहे.
व्हीआयपी दर्शन आणि विशेष पूजांना बंदी
कार्तिकी एकादशी सोहळ्यादरम्यान व्हीआयपी दर्शन तसेच भाविकांच्या हस्ते होणाऱ्या विशेष पूजांना बंदी घालण्यात आली आहे. मंदिरातील सर्व पारंपरिक पूजा, मिरवणुका आणि विधी मात्र परंपरेनुसार आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडले जाणार आहेत.
मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले की, श्रींचा पलंग काढणे, महानैवेद्य, श्रींच्या पादुकांची मिरवणूक, महाद्वार काला आणि प्रक्षाळपूजा अशा सर्व पारंपरिक विधींचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे.
भक्तांसाठी अखंड दर्शनाचा आनंद
मंदिर प्रशासनाने भाविकांना आवाहन केले आहे की, दर्शनादरम्यान शिस्त पाळावी, मंदिर परिसर स्वच्छ ठेवावा आणि दर्शनाचा लाभ शांततेने घ्यावा.
यंदाच्या कार्तिकी वारीत “विठ्ठल नामाची अखंड गजर आणि २४ तास दर्शनाचा लाभ” ही भक्तांसाठी सर्वात मोठी आनंदवार्ता ठरणार आहे!