जालना जिल्ह्यातील वरुड गावात शेतात काम करत असताना विजेचा धक्का लागून एका शेतकरी पित्यासह त्याच्या दोन चिमुकल्या मुलांचा दुर्दैवी अंत झाला. वडिलांना वाचवण्यासाठी धावलेल्या मुलांनाही विजेचा धक्का लागल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

जालना: जालना जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शेतात काम करत असताना विजेचा धक्का लागून एका शेतकरी पित्यासह त्याच्या दोन चिमुकल्या मुलांचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेने जालना जिल्ह्यातील वरुड गावावर शोककळा पसरली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

सध्या पावसाने दडी मारल्याने शेतकरी खरीप हंगामाची कामे आटोपण्यात व्यस्त आहेत. पेरणीसह पावसाळ्यापूर्वीची तयारी करण्यासाठी अनेक शेतकरी आपल्या कुटुंबासह शेतात जात आहेत. मात्र, याच शेतीकामासाठी गेलेल्या विनोद मस्के यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

मिळालेल्या माहितीनुसार, जालना तालुक्यातील वरुड गावात शेतात काम करत असताना विनोद मस्के यांना विद्युत तारेचा जोरदार शॉक बसला. वडिलांना वाचवण्यासाठी गेलेले त्यांचा मुलगा समर्थ आणि मुलगी श्रद्धा मस्के यांनाही विजेचा धक्का बसला आणि तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तात्काळ तिघांनाही जालना शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. सध्या तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जालना सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे वरुड गावासह संपूर्ण जालना जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून, सर्वत्र शोककळा पसरली आहे.