कोकण विभागात पावसाने जोर पकडला असून मुंबईत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. दक्षिण कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असून बुधवारी चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई: पावसाचे आता २ महिने शिल्लक असताना अनेक ठिकाणी त्यानं जोर पकडलेला दिसून आला आहे. कोकण विभागात तर १ जूनपासून चांगला पाऊसच झाला नाही. त्यामुळं तिथं पावसाची मोठ्या प्रमाणावर कमतरता दिसून येत आहे. मुंबईच्या अनेक भागांमध्ये रविवारच्या रात्रीपासून चांगला पाऊस पडत आहे. काही ठिकाणी रात्री पडत असलेल्या पावसामुळे लोकांचा खोळंबा झाला आहे.

दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस पडणार 

दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईत शनिवारी सकाळी ८.३० ते रविवारी सकाळी ८.३०पर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे ३.१, तर कुलाबा येथे १.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रविवारी सकाळी ८.३० ते सायं. ५.३०पर्यंत सांताक्रूझ येथे ६ मिलीमीटर, तर कुलाबा येथे अजिबात पाऊस नव्हता.

बुधवारी चांगला पाऊस होणार 

याच आठवड्यात बुधवारी चांगला पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. १३ ऑगस्टला कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळं पाऊस पडणार असून कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. १३ ऑगस्टला महामुंबई परिसरात मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. १४ ऑगस्टला रत्नागिरी, सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो, तर मध्य महाराष्ट्रातही काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

विदर्भात ऑरेंज अलर्ट 

विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून नागरिकांना काळजी घेण्याचं अवाहन करण्यात आलं आहे. गडचिरोली आणि यवतमाळ परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहेत. या परिसरात नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. त्यामुळं या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी.