रायगड जिल्ह्यात एका आदिवासी जोडप्याला सामुदायिक परंपरेविरुद्ध लग्न केल्यामुळं नांगराला जुंपून ओढण्याची शिक्षा देण्यात आली. कंजामाजोडी गावात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

रायगड जिल्ह्यातून एक चीड आणणारी घटना समोर आली आहे. आधुनिक जगात अशा घटना घडू शकतात यावर मात्र आपला विश्वास मात्र बसणार नाही. रायगडमध्ये एका आदिवासी जोडप्याला अत्यंत घृणास्पद काम करण्यास भाग पाडण्यात आलं होतं. या जोडप्याने सामुदायिक परंपरेविरुद्ध लग्न केल्यामुळं त्यांना ही शिक्षा देण्यात आली. त्या दोघांना नांगराला जुंपून तो ओढण्यास भाग पाडण्यात आलं होतं.

तरुण आणि महिला ओढत होते नांगर 

कल्याणसिंगपूर पोलिस हद्दीतील कंजामाजोडी गावात बुधवारी ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती आहे. महिला आणि तरुण दोघेही नांगर ओढत असतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कंजामजोडी गावकरी आणि समाजातील वृद्ध व्यक्तींसमोर त्यांना नांगर ओढण्यास सांगितल्याचं व्हिडिओमधून दिसून येत आहे.

समाजातील नियमांचं केलं उल्लंघन 

गावकऱ्यांच्या मते या तरुणाने आणि महिलेने समाजातील नियम तोडले होते, त्यामुळं दोघांचं शुद्धीकरण करण्यात आले. मुलाने आपल्या वडिलांच्या बहिणीशी म्हणजेच आत्याशी विवाह केला होता. हा विवाह झालेलं गावकऱ्यांना आणि नातेवाईकांना समजल्यानंतर दोघांना गावात एका ठिकाणी बोलावण्यात आले. दोघांचं शुद्धीकरण झाल्यानंतर त्यांनी गाव सोडलं आणि त्यांचा पत्ता कोणालाही माहित नाही.

गावप्रमुखाने याबद्दलची माहिती दिली आहे. त्यानं बोलताना सांगितलं आहे की, अमानुषपणे दोघांना दिली वागणूक आम्ही शुद्धीकरण विधी केले आणि त्यांना शिक्षा केली. यामुळे त्यांना रक्ताच्या नात्यातील विवाह केल्याने झालेल्या पापापासून मुक्तता मिळेल. असा विधी केला नसता तर गावात पाऊस पडला नसता. यामुळे त्यांच्या पिकाचे नुकसान झाले असते. रायगडच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेचा अमानवी असा उल्लेख केला आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी गावाला भेट देणार आहे. चौकशीदरम्यान दोषी आढळलेल्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.