Dr. Gauri Palve Death Case : डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात त्यांच्या पती अनंत गर्जेची पोलिस कोठडी २ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. दोघांच्याही शरीरावर अनेक जखमा आढळल्याने मृत्यू आत्महत्या की हत्या याबाबत संशय वाढला आहे. 

Dr. Gauri Palve Death Case : मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय साहाय्यक आणि दिवंगत डॉ. गौरी पालवे-गर्जे यांचे पती अनंत गर्जे याची पोलिस कोठडी न्यायालयाने २ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अनंत आणि मृत गौरी यांच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. मात्र या जखमा नेमक्या कशामुळे झाल्या हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याने हा मृत्यू आत्महत्या आहे की हत्या, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकरणात गर्जे भावंडांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नेमके काय घडले होते?

२२ नोव्हेंबरला वरळी येथील बीडीडी नवीन वसाहतीतील घरी केईएम रुग्णालयातील दंत चिकित्सक डॉ. गौरी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी प्राथमिक माहिती मिळाली होती. मात्र त्यांच्या पालकांनी मुलीवर अत्याचार व छळ झाल्याचे गंभीर आरोप केल्यानंतर वरळी पोलिसांनी अनंत गर्जेसह त्याचा भाऊ अजय आणि बहीण शीतल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर अनंतला अटक करण्यात आली आणि २७ नोव्हेंबरपर्यंत कोठडी देण्यात आली होती. कोठडी संपल्याने गुरुवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले.

दोघांच्याही शरीरावर अनेक संशयास्पद जखमा

न्यायालयात दिलेल्या नवीन माहितीनुसार, इन्क्वेस्ट पंचनाम्यात डॉ. गौरी यांच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्या. तसंच अटकेनंतर करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत अनंतच्या शरीरावरही जखमा आढळल्या आहेत. या जखमांचे स्वरूप, कालावधी आणि कारण जाणून घेण्यासाठी पोलिस स्वतंत्र तपास करत आहेत. तसेच अनंतने गौरीसोबत झालेल्या काही संभाषणाची मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग केल्याचेही समोर आले आहे. ही रेकॉर्डिंग तपासात अत्यंत महत्त्वाची ठरणार असून त्याचे फॉरेन्सिक विश्लेषण केले जाणार आहे.

गर्जे भावंडांचा शोध सुरू

या प्रकरणात अनंत गर्जेच्या दोन भावंडांचा शोध अद्याप सुरू आहे. त्यांना अटक करण्यासाठी आणि प्रकरणातील धागेदोरे जोडण्यासाठी आरोपी अनंतची कोठडी आणखी आवश्यक असल्याचे सरकारी वकिलांनी म्हटले. त्यामुळे पुढील तपासात नवीन माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांना मिळालेल्या नवीन पुराव्यांच्या आधारे हा मृत्यू आत्महत्या होता की हत्या, याचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.