Devendra Fadnavis: राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ३१,६२८ कोटी मदत पॅकेजची घोषणा केली आहे. या पॅकेजअंतर्गत पीक, घरे, जनावरे आणि पायाभूत सुविधांच्या नुकसानीसाठी १० महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत.
मुंबई: राज्यात पावसाने थैमान घातले असून, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेती, घरे, जनावरं आणि पायाभूत सुविधा या साऱ्यांवर यंदाच्या पावसाने जबरदस्त आघात केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याही उपस्थितीत पार पडलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घोषणांचा पाऊस पडला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी 31,628 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा करताना शेतकऱ्यांच्या विविध नुकसानीसाठी 10 ठोस निर्णय जाहीर केले आहेत. हे निर्णय राज्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरू शकतात.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून जाहीर झालेल्या 10 महत्त्वाच्या घोषणा
1. 31,628 कोटी रुपयांचं मदत पॅकेज – राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी.
2. कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टर 18,500 रुपये – पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी आर्थिक मदत.
3. हंगामी बागायती शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर 27,000 रुपये – विशेष मदत.
4. बागायती शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर 32,500 रुपये – नुकसानभरपाई.
5. विहिरीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 30,000 रुपये – विशेष सहाय्य.
6. इन्फ्रास्ट्रक्चरच्या दुरुस्तीसाठी 10,000 कोटींची तरतूद – रस्ते, पूल, वीज आणि जलवाहिन्यांसाठी.
7. घरांचं नुकसान – संपूर्ण उद्ध्वस्त घरांना पीएम आवास योजनेंतर्गत नवं घर आणि अंशतः नुकसान झालेल्यांना घरबांधणीसाठी निधी.
8. जनावरांचं नुकसान झाल्यास प्रति पशू 37,000 रुपये – आर्थिक मदत.
9. जमीन खरडून गेल्यास प्रति हेक्टर 3.5 लाखांची मदत – त्यात 47,000 रुपये रोख आणि उर्वरित मनरेगा अंतर्गत.
10. पीक विमा असणाऱ्यांना नुकसानभरपाई – विम्याअंतर्गत भरपाई तत्काळ देण्यात येणार.
ही सर्व मदत त्वरित आणि पारदर्शक पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची हमी सरकारने दिली आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हे निर्णय केवळ आर्थिक नव्हे तर मानसिक आधार ठरणार आहेत.


