Pune Rave Party : पुण्यातील कथित रेव्ह पार्टी प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक झाली आहे. खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली असून सखोल तपासाची मागणी केली आहे.
जळगाव : पुण्यातील एका कथित रेव्ह पार्टी प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. खराडी परिसरातील या छापेमारीत पोलिसांनी अमली पदार्थ सापडल्याचा दावा केला आहे. या गंभीर प्रकरणानंतर एकनाथ खडसे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन आपली स्पष्ट भूमिका मांडली.
'गुन्हेगार असतील तर समर्थन नाही, पण अडकवण्याचा प्रयत्न सहन करणार नाही!' : एकनाथ खडसे
जळगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे यांनी या प्रकरणावर परखडपणे भाष्य केले. "गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वातावरणामुळे असे काहीतरी घडू शकते, याचा अंदाज मला थोडाफार येत होता," असे सांगत त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर सूचक भाष्य केले.
खडसे म्हणाले, "जर ही खऱ्या अर्थाने रेव्ह पार्टी असेल आणि त्यात आमचे जावई प्रांजल खेवलकर गुन्हेगार आढळले, तर मी त्यांचे कदापि समर्थन करणार नाही. पण, पोलीस यंत्रणेने या प्रकरणाचा तपास प्रामाणिकपणे करावा, अशी माझी अपेक्षा आहे." त्यांनी पुढे सांगितले की, "पोलिसांबद्दल जनमानसात 'ते काहीही करू शकतात' अशी भावना आहे. त्यामुळे, फॉरेन्सिक लॅब रिपोर्ट, ब्लड रिपोर्ट आणि इतर सर्व अहवाल समोर येणे आवश्यक आहे. अपुऱ्या माहितीच्या आधारावर भाष्य करणे योग्य नाही."
सखोल तपासाची मागणी आणि पुढील पत्रकार परिषदेचा इशारा
एकनाथ खडसे यांनी या प्रकरणात सखोल आणि निष्पक्ष तपासाची मागणी केली आहे. ते म्हणाले, "सध्या वृत्तवाहिन्यांवर लोकांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत, त्यावरून हे प्रकरण कशाप्रकारे घडवले जात आहे किंवा घडत आहे, हे दिसते आहे. पण, सत्य समोर येईल. यामध्ये जावई असो किंवा कोणीही असो, दोषी आढळल्यास निश्चितपणे शिक्षा झाली पाहिजे. परंतु, जर कोणाला जाणूनबुजून अडकवण्याचा प्रयत्न होत असेल, तर ते सहन केले जाणार नाही आणि त्याला निश्चितपणे विरोध केला जाईल."
या प्रकरणाची अधिक सखोल माहिती घेऊन ते लवकरच पुन्हा पत्रकार परिषद घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावरून, एकनाथ खडसे या प्रकरणात आपल्या जावयाच्या पाठीशी उभे राहतानाच, पोलिसांच्या तपासावरही बारीक लक्ष ठेवणार असल्याचे संकेत मिळत आहेत.


