Dhananjay Munde : २०० दिवसांच्या मौनव्रतानंतर धनंजय मुंडे यांनी बीडमधील राष्ट्रवादीच्या 'निर्धार मेळाव्यात' आपलं मौन सोडलं. विरोधकांवर शायरीच्या माध्यमातून हल्लाबोल करत त्यांनी बीड जिल्ह्याची बदनामी करण्याचा आरोप केला. 

बीड : जवळपास २०० दिवसांच्या मौनानंतर अखेर धनंजय मुंडे यांनी जाहीर कार्यक्रमात आपलं मौन सोडलं. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आयोजित 'निर्धार मेळावा' या भव्य सभेत त्यांनी विरोधकांवर शेरो-शायरीच्या माध्यमातून शब्दांचा जोरदार प्रहार केला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना तुरुंगवास भोगावा लागल्यानंतर धनंजय मुंडेंवर अनेक गंभीर आरोप झाले. यानंतर कृषी खात्यातील कथित गैरव्यवहार प्रकरणही उफाळून आले आणि परिणामी, त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर तब्बल २०० दिवस त्यांनी सार्वजनिकरित्या भाषण टाळलं होतं.

पण आता, बीडमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात, धनंजय मुंडेंनी ती दीर्घ मौनव्रताची भिंत फोडली आणि आपल्या खास शैलीत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. "न बोलण्याची डबल सेंच्युरी झाली आहे," असं म्हणत त्यांनी भाषणाची सुरुवात केली आणि पुढे म्हणाले, "या २०० दिवसांत अनेक गोष्टी घडल्या, पण एक गोष्ट माझ्या जिव्हारी लागली. माझ्या बीड जिल्ह्याची बदनामी करण्यात आली. जर वैर माझ्याशी असेल, तर माझ्या मातीची नाहक बदनामी का केली?" असा थेट सवाल त्यांनी केला.

शब्दांची शायरीतून हल्लाबोल...

आपल्या भाषणात मुंडेंनी विरोधकांवर टीकेचा बाण सोडताना शायरीचा वापर करत टोकदार हल्ला चढवला.

"तुम्हारी सोच के सांचे में ढल नहीं सकता,

जुबान काट लो, लहजा बदल नहीं सकता,

मुझे मोम का पुतला समझ रहे हो क्या?

तुम्हारे लोह से ये लोहा पिघल नहीं सकता!"

या ओळींनी सभागृहात एकच उत्साह संचारला. मधल्या काळात एका व्यक्तीच्या चारित्र्यावर, एका जिल्ह्यावर, आणि एका मतदारसंघावर जे आरोप आणि बदनामी केली गेली, त्यावर मुंडेंचा हा संताप स्पष्ट दिसत होता.

पुन्हा मैदानात उतरल्याचा निर्धार

मुंडे म्हणाले, "आज भाषण करायचं नव्हतं. पण पक्षाच्या बीड जिल्ह्याबाबतच्या अपेक्षा लक्षात घेता, मैदानात उतरायचंच, हा निर्धार केला. आज प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हे वचन देतो. जिल्ह्याला पुन्हा उभं करायचं काम मी करीन." मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रकृतीच्या कारणास्तव धनंजय मुंडे सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते. अधूनमधून काही ठराविक ठिकाणी ते उपस्थित राहिले, आणि विधीमंडळातही आपली उपस्थिती दाखवत बीड जिल्ह्याच्या प्रश्नांवर आवाज उठवत राहिले. विशेषतः, अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या प्रकरणावर त्यांनी विधिमंडळात आवाज उठवला होता.

निवडणुकांचं रण तोंडावर...

राजकीय वर्तुळात हे भाषण आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'पुनरागमनाची रणभेरी' मानलं जात आहे. आता, मुंडेंचा निर्धार, त्यांची आक्रमक भूमिका, आणि शेरो-शायरीतून व्यक्त होणारा आत्मविश्वास पाहता विरोधकांसमोर आव्हान उभं राहणं निश्चित आहे.