Who is D B Patil: दि. बा. पाटील हे रायगडमधील एक प्रमुख शेतकरी नेते, राजकीय व्यक्तिमत्व होते, ज्यांनी आपले जीवन शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी समर्पित केले. त्यांनी सिडको आणि जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांसाठी यशस्वी लढा दिला.
Who is D B Patil: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची जोरदार मागणी सध्या सुरू आहे. पण, अनेकांना हा प्रश्न सतावतो कोण होते हे दि. बा. पाटील? त्यांच्या कर्तृत्वाचा, संघर्षाचा आणि ठसा उमटवणाऱ्या कारकिर्दीचा मागोवा घेणे हे आजच्या काळात अत्यंत गरजेचे ठरते.
शिक्षणवेड्या घरात जन्मलेला कडवट संघर्षकर्ता
दि.बा. पाटील यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील जासई या लहानशा गावात, १३ जानेवारी १९२६ रोजी झाला. त्यांचे वडील बाळू गौरू पाटील आणि आई माधूबाई पाटील दोघेही शिक्षक होते. घरात शिक्षणाचे महत्त्व होतेच, पण परिस्थिती मात्र अतिशय हलाखीची.
पुण्यात वकिलीचे शिक्षण घेत असतानाही त्यांचा संघर्ष सुरूच होता. त्यांच्या शिक्षणामध्ये बंधू आत्माराम पाटील यांनी मोलाची साथ दिली. त्यांच्या पत्नी ऊर्मिला पाटील या देखील शिक्षिका होत्या पनवेल येथील के.व्ही. कन्या विद्यालयात त्यांनी काम केले.
शेतकऱ्यांचा नेता, सत्ताधाऱ्यांना हादरवणारा आवाज
दि.बा. पाटील यांची कारकीर्द सामाजिक कार्यकर्ता ते राजकीय लढवय्या अशी झपाट्याने उभी राहिली. पनवेल नगरपरिषदेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष, कुलाबा लोकल बोर्डचे सदस्य, पाच वेळा आमदार, एक वेळेचे विधान परिषद सदस्य, राज्याचे विरोधी पक्षनेते आणि दोन वेळा खासदार म्हणून त्यांनी राज्य व केंद्रात प्रभावी कामगिरी बजावली.
त्यांची भाषणे अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद असत. "दिबा उभा राहिला की सभागृह शांत होत असे" अशी त्यांची प्रतिमा होती. सत्ताधाऱ्यांमध्ये भीती आणि विरोधकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा आवाज होता.
शेतकरी लढ्यांचा शिल्पकार
सिडको आणि जेएनपीटी प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांचे खंबीर नेतृत्व दि. बा. पाटील यांनी केले. १९८४ मधील सिडको विरोधी आंदोलनात गोळीबार झाला, पाच शेतकरी मरण पावले, शंभरहून अधिक जखमी झाले पण या लढ्यामुळे शेतकऱ्यांना जमिनीचा "साडेबारा टक्के" मोबदला मिळवून देण्यात यश मिळाले.
जासईतील लढ्यामुळे दि.बा. पाटील हे आगरी, कोळी, कराडी समाजाचे नायक ठरले. त्यांच्या साध्या राहणी व उच्च विचारसरणीमुळे लाखोंचा पाठिंबा मिळवला.
राजकारण संपले, पण समाजसेवा सुरूच
दि. बा. पाटील यांनी १९९९ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला, पण त्यानंतर सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले. मात्र शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी त्यांचे काम अखेरपर्यंत सुरूच राहिले. त्यांनी अंधश्रद्धा, अवाजवी परंपरा, मद्यप्राशन आणि दिखाऊ समारंभ यांना विरोध करत समाजात जागृती केली.
दि. बा. पाटील यांची प्रमुख कामगिरी (Timeline)
वर्ष कार्य / घटना
१९२६ जन्म – जासई, पनवेल
१९५७ शे.का.प.चे मध्यवर्ती चिटणीस
१९५७-८४ पाच वेळा आमदार
१९६० जासई हायस्कूलची स्थापना
१९७० पनवेल कॉलेजची स्थापना
१९७४ पनवेल नगराध्यक्ष
१९८२-८३ विरोधी पक्षनेते, विधान सभा
१९८४ सिडको लढा – प्रकल्पग्रस्तांसाठी यश
१९९६ संसदीय उत्कृष्ट वक्ता पुरस्कार
२०१३ निधन – २४ जून, पनवेल
विचारांचे अग्रदूत
महात्मा फुले, शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे त्यांच्या समाजकार्यासाठी मार्गदर्शक ठरले. ‘आगरी दर्पण’ मासिकाच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधनाचा वसा सुरू ठेवला.
का व्हावे विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव?
नवी मुंबईतील भूमिपुत्र, शेतकरी आणि प्रकल्पग्रस्त जनतेसाठी लढणारा एकमेव चेहरा म्हणजे दि. बा. पाटील. ज्यांच्या नेतृत्वामुळे प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला, त्या माणसाच्या नावानेच नवी मुंबई विमानतळ ओळखला गेला पाहिजे हीच आज जनतेची मागणी आहे.


