CM Devendra Fadnavis Delhi Visit : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अचानक दिल्ली दौऱ्यानंतर राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. 

CM Devendra Fadnavis Delhi Visit : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ फेब्रुवारीच्या रात्री अचानक दिल्ली गाठल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी रात्री उशिरापर्यंत चर्चा करून फडणवीस पहाटेच मुंबईत परतले. राज्यातील सध्याच्या घडामोडी आणि आगामी राजकीय निर्णयांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

गुप्त दिल्ली दौऱ्याला विशेष महत्त्व

पुढील काही दिवसांत राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गोपनीय दिल्ली दौरा निर्णायक ठरू शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

फडणवीसांनंतर सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दिल्ली भेटीनंतर आता दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. त्या आज सायंकाळी ६.४५ वाजता दिल्लीला रवाना होणार असून उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर सदिच्छा भेटीसाठी हा दौरा असल्याची माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

वरिष्ठ नेतेही सोबत

सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्याला अधिक वजन प्राप्त झाले असून या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल हेही सोबत असणार आहेत. त्यामुळे या भेटी केवळ औपचारिक नसून राजकीय चर्चांसाठी महत्त्वाच्या ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांत महायुतीचा दबदबा

दरम्यान, राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) दुसऱ्या स्थानावर राहिली आहे. जिल्हा परिषदांच्या ७३१ जागांपैकी भाजपने २३३ जागा जिंकल्या असून अजित पवार गटाला १६७ आणि शिंदेसेनेला १६२ जागा मिळाल्या आहेत. महायुतीने एकूण ५६२ जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

महाविकास आघाडीची पिछेहाट

या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळालेले नाही. काँग्रेसला ५६, शरद पवार गटाला २६ आणि उद्धव ठाकरे गटाला ४३ जागांवर समाधान मानावे लागले. एकूणच निवडणूक निकालांनी राज्यातील सत्तासमीकरणांवर महायुतीची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.