ST Employees Protest : थकीत वेतनवाढीचा हप्ता न मिळाल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. 11 फेब्रुवारीपर्यंत निर्णय न झाल्यास 12 फेब्रुवारीपासून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा कामगार संघटनेने दिला आहे.

ST Employees Protest : राज्य परिवहन एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि थकीत वेतनवाढीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकार आणि महामंडळ स्तरावरून कोणतीही ठोस हालचाल न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने आक्रमक भूमिका घेत 11 फेब्रुवारीपर्यंत निर्णय न झाल्यास 12 फेब्रुवारीपासून राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

प्रशासनाची उदासीनता, कर्मचाऱ्यांचा संताप

गेल्या काही काळापासून थकीत वेतनवाढीचे हप्ते रखडले असून, याबाबत सरकार आणि एसटी महामंडळाकडून कोणतीही स्पष्ट भूमिका मांडण्यात आलेली नाही. परिणामी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढत चालला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही निर्णय न झाल्याने संघटनांनी आंदोलनाचा मार्ग निवडण्याचा इशारा दिला आहे.

आश्वासनांची अंमलबजावणी कागदावरच?

परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन दिले होते. 2020 ते 2024 या कालावधीत कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 6,500 रुपयांची वाढ करण्यात आली होती. या वाढीमुळे निर्माण झालेली थकबाकी 48 समान हप्त्यांमध्ये देण्याचा निर्णय झाला होता. डिसेंबर 2025 पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली होती. मात्र, फेब्रुवारी 2026 च्या वेतनात हा हप्ता न मिळाल्याने कर्मचाऱ्यांचा रोष उफाळून आला आहे.

वाढीव हप्ता गायब; कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले

अल्प वेतनावर काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी हा वाढीव हप्ता मोठा आधार होता. महागाईच्या पार्श्वभूमीवर घरखर्च, बँक कर्जाचे हप्ते आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च यांचे नियोजन कर्मचाऱ्यांनी या वाढीव रकमेवर आधारित केले होते. मात्र, फेब्रुवारी महिन्यात हा हप्ता न मिळाल्याने अनेक कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

संघटनेच्या प्रमुख मागण्या काय?

महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने प्रशासनासमोर खालील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत –

  • रखडलेला थकबाकीचा हप्ता त्वरित कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करावा.
  • वेतन करारातील प्रलंबित मुद्द्यांवर तातडीने बैठक घ्यावी.
  • भविष्यात वेतनवाढीचे हप्ते रोखले जाणार नाहीत, याची लेखी हमी द्यावी.

12 फेब्रुवारीपासून राज्यभर आंदोलनाची शक्यता

संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की, 11 फेब्रुवारीच्या संध्याकाळपर्यंत महामंडळाने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर 12 फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व एसटी आगार आणि विभागीय कार्यालयांसमोर कर्मचारी काळ्या फिती लावून निदर्शने करतील. त्यामुळे येत्या काळात एसटी सेवांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.