Chipi Airport : DGCAने सिंधुदुर्गच्या चीपी विमानतळाला ऑल वेदर ऑपरेशन्सची मंजुरी दिल्याने आता 24 तास विमानसेवा आणि नाईट लँडिंग शक्य होणार आहे. पार्किंग क्षमतेत वाढ झाल्याने पर्यटन आणि व्यवसायाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. 

Chipi Airport : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चीपी विमानतळामुळे कोकणात येणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) सिंधुदुर्ग विमानतळाला ‘ऑल वेदर ऑपरेशन्स’ श्रेणीत मंजुरी दिल्याने आता दिवसासह रात्री आणि प्रतिकूल हवामानातही विमानसेवा सुरू राहणार आहे. यामुळे पर्यटनासोबतच स्थानिक व्यवसायालाही मोठी चालना मिळणार आहे.

पाच वर्षांनंतर महत्त्वाचा टप्पा, 24 तास सेवा

सुरू होऊन तब्बल पाच वर्षांनंतर सिंधुदुर्गच्या चीपी विमानतळाने हा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. DGCAकडून IFR (Instrument Flight Rules) लायसन्स आणि ऑपरेशनल मंजुरी मिळाल्याने आता विमानतळावर 24 तास विमानसेवा उपलब्ध राहणार आहे. यामुळे नाईट लँडिंगसह खराब हवामानातही विमान उतरवणे शक्य होणार आहे.

पार्किंग क्षमतेत दुप्पट वाढ

ऑल वेदर मंजुरीसोबतच विमानतळावरील पार्किंग क्षमतेतही वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी एकावेळी तीन विमाने पार्क करता येत होती, मात्र आता सहा विमाने एकाचवेळी पार्क करता येणार आहेत. यामुळे भविष्यातील प्रवासी आणि विमानसेवा वाढीस पोषक वातावरण तयार होणार आहे.

नाईट लँडिंगसाठी राजकीय पाठपुरावा

चीपी विमानतळाला नाईट लँडिंगची सुविधा मिळावी यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासोबत समन्वय साधत तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या. तसेच रात्रीच्या वेळी विमानतळाला पुरेसा विद्युत पुरवठा मिळावा यासाठीही विशेष प्रयत्न करण्यात आले.

पर्यटन आणि व्यवसायाला मोठी चालना

आतापर्यंत हवामान मर्यादांमुळे केवळ दिवसा विमानसेवा उपलब्ध असल्याने पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. आता नाईट लँडिंग आणि ऑल वेदर ऑपरेशन्समुळे सिंधुदुर्गातील पर्यटन, हॉटेल व्यवसाय आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार आहे.