सार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, बाळासाहेब ठाकरे काँग्रेसला दूर ठेवायचे. पण त्यांच्याच मुलाने मुख्यमंत्रीपदाच्या मोहात काँग्रेसशी हातमिळवणी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचा आगामी मुख्यमंत्री कोण असेल याबाबतची माहिती दिली आहे. यावेळी बोलताना शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी पुढे बोलताना म्हटलं आहे की, “बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, की काँग्रेसला दूर ठेवा. नाहीतर मी माझं दुकान बंद करेन. पण त्यांच्याच मुलाने मुख्यमंत्रीपदाच्या मोहात काँग्रेसशी हातमिळवणी करत युती केली. वैयक्तिक स्वार्थासाठी , मोहाच्या जाळ्यात अडकून त्यांनी ( उद्धव ठाकरे) काँग्रेससोबतच सरकार स्थापन केलं.”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले -
आम्ही कार्यकर्ते आहोत, पक्षाचा आदेश मानतो, शिस्त असते ती पाळतो. परिस्थिती बदलेल का, शिवसेना-भाजप युती पुन्हा होईल का याचा आम्ही विचार करत होतो. पण आमच्या लाख प्रयत्नानंतरही ते शक्य झालं नाही. शिवसेनेते, शिवसैनिकांचं नुकसान होत होतं, शिवसेना संपुष्टात येत असल्याने आम्ही हा निर्णय घेतला आणि भाजपासोबत गेलो, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
मी टीम लीडर -
” सध्या मी या टीमचा लीडर आहे आणि आमची टीम काम करत आहे. आमच्याकडे पहिला, दुसरा किंवा तिसरा असा कोणताही फॉर्म्युला नाही. आम्ही एक टीम म्हणून काम करत आहोत ज्यात सर्वजण समान आहेत. पण विरोधी पक्षाकडे बघाल तर तिथे मुख्यमंत्रीपदावरूनच रस्सीखेच सुरू आहे. ज्याला बघाव त्याला मुख्यमंत्री व्हायचं आहे, वाद सुरू आहे. जनतेला काय देऊ शकतो ? असा विचार करणाऱ्या लोकांचीची राज्यातील जनतेला गरज आहे” असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.