Summer Special Trains : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यासह देशभरातील विविध मार्गांवर एकूण 1,484 उन्हाळी विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.
Summer Special Trains : उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात पर्यटन आणि बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. ही वाढती गर्दी लक्षात घेऊन Central Railway ने महत्त्वाचा निर्णय घेत 1,484 उन्हाळी विशेष गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. या गाड्यांमुळे राज्यातील तसेच देशभरातील विविध मार्गांवरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
उन्हाळ्यात रेल्वे प्रवासाला मोठी मागणी
राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परीक्षा संपल्यानंतर उन्हाळी सुट्ट्यांना सुरुवात होते. या काळात अनेक कुटुंबे पर्यटनासाठी किंवा नातेवाईकांकडे जाण्यासाठी रेल्वेचा पर्याय निवडतात. सुरक्षित, स्वस्त आणि आरामदायी प्रवासामुळे रेल्वेला पहिली पसंती दिली जाते. त्यामुळे उन्हाळी गाड्यांचे ऑनलाइन बुकिंग सुरू होताच काही दिवसांतच तिकीटे वेटिंगवर जातात.
उत्तर आणि मध्य भारतातील गाड्यांना मोठी गर्दी
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये उत्तर आणि मध्य भारतात जाणाऱ्या गाड्यांना मोठी मागणी असते. पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. अनेक वेळा वेटिंग लिस्ट 200 ते 400 पर्यंत जाते. त्यामुळे काही प्रवाशांना खासगी वाहन किंवा बसने प्रवास करावा लागतो, ज्यामुळे अतिरिक्त खर्च सहन करावा लागतो.
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्गांवर गाड्या
महाराष्ट्रात धावणाऱ्या विशेष उन्हाळी गाड्यांमध्ये मुंबई/दौंड सोलापूर, पुणे - कोल्हापूर, नाशिक रोड- बडनेरा आणि हडपसर- हरंगुळ या मार्गांचा समावेश आहे.
महाराष्ट्राबाहेरील मार्गांवरही सेवा
राज्याबाहेरील महत्त्वाच्या मार्गांवरही विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. यातमुंबई- बलिया, मुंबई- गोरखपूर, दौंड- कलबुर्गी आणि सोलापूर- कलबुर्गी / अनकापल्ली या मार्गांचा समावेश आहे. प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


