एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याला विरोध करणाऱ्यांना संपवून टाकू, अशी धमकी मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली होती.

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मौनावर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याला जो कोणी विरोध करेल, त्याला संपवून टाकू, अशी धमकी मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली होती. यावर गृहमंत्री असलेले फडणवीस गप्प का, असा सवाल राऊतांनी केला. राज्याच्या मंत्रिमंडळातील एखादा मंत्री अशी भाषा कशी काय वापरू शकतो, यावर त्यांनी बोट ठेवलं.

पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले, "एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करा, असं म्हणत गुलाबराव पाटलांनी थेट धमकीच दिली आहे. जे कोणी शिंदेंच्या मार्गात येतील, त्यांचा सत्यानाश करू, असं ते म्हणालेत. हा माणूस देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आहे. फडणवीसांच्या मंत्रिमंडळात काय लॉरेन्स बिश्नोई गँगचे लोक बसलेत का? हे लोक कोणाला संपवणार आहेत? देवेंद्र फडणवीसांना? की मुख्यमंत्र्यांना? ही तर थेट धमकीच आहे."

"गुलाबराव पाटील जर अशी धमकी देत असतील, तर देवेंद्र फडणवीस काय करत आहेत? तुम्ही लॉरेन्स बिश्नोई गँगला घाबरलात का? तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहात. तुमच्या राज्यात आणि मंत्रिमंडळात नेमकं काय चाललंय, याकडे जरा लक्ष द्या," असा टोलाही राऊतांनी लगावला.

गुलाबराव पाटलांचं नेमकं वक्तव्य काय?

गोरेगावमध्ये झालेल्या दसरा मेळाव्यात बोलताना गुलाबराव पाटील यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. भविष्यात एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी आपली इच्छा असल्याचं ते म्हणाले होते. "भविष्यात एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो. जो जो शिंदे साहेबांना आडवा येईल... त्याचा सत्यानाश हो," असं पाटील म्हणाले होते.

२०१९ च्या युतीवरून शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

दुसरीकडे, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०१९ मध्ये स्थापन झालेल्या महाविकास आघाडी (मविआ) सरकारला महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील 'सर्वात मोठी मतांची चोरी' म्हटलं आहे. मंगळवारी पक्षाचे नेते, खासदार, आमदार आणि शिवसैनिकांच्या एका मोठ्या मेळाव्यात बोलताना शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. २०१९ मध्ये ज्यांनी जनतेच्या जनादेशाचा विश्वासघात केला, तेच खरे राजकीय फसवणूक करणारे लोक आहेत, अशी टीका त्यांनी केली.

"२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. पण तुम्ही महाविकास आघाडीसोबत जाऊन सरकार स्थापन केलं. हीच सर्वात मोठी मतांची चोरी होती. मुख्यमंत्री होण्यासाठी ज्यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला, तेच खरे मतांचे चोर आहेत," असा घणाघात शिंदेंनी केला.