Chandrapur Mayor Election : महानगरपालिका निवडणुकीनंतर तीन आठवडे सुरू असलेल्या सत्तानाट्याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस बहुमतापासून दूर राहिल्याने निर्माण झालेल्या पेचात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने भाजपला पाठिंबा दिला.
Chandrapur Mayor Election : चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागून तीन आठवडे उलटल्यानंतरही सुरू असलेले सत्तानाट्य अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. काँग्रेसला घवघवीत यश मिळूनही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने महापौरपदावरून पक्षांतर्गत वाद उफाळला होता. मात्र, आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने चंद्रपूर महापालिकेत सत्ता भाजपच्या हाती गेली आहे.
भाजपच्या संगीता खांडेकर महापौर
शिवसेना (उबाठा) पक्षाच्या संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वाखालील गटाने भाजपला पाठिंबा दिल्यामुळे भाजपसाठी महापौरपदाचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार, भाजपच्या संगीता खांडेकर या महापौरपदाच्या निवडणुकीत अवघ्या एका मताच्या फरकाने विजयी झाल्या आहेत.
काँग्रेसमधील वादाने वाढला पेच
या महानगरपालिकेत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. मात्र बहुमतापासून काही जागा कमी पडल्याने पक्षात खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्या गटात महापौरपदावरून मतभेद निर्माण झाले. हा तिढा काही दिवसांपूर्वी दिल्ली स्तरावर सुटल्याचे सांगितले जात होते, मात्र तोपर्यंत राजकीय समीकरणे बदलली होती.
सत्तेचा फॉर्म्युला काय ठरला?
- काँग्रेससोबतची चर्चा फिस्कटल्यानंतर शिवसेना (उबाठा) च्या स्थानिक नेतृत्वाने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. ठरलेल्या सत्तासूत्रानुसार,
- महापौरपद भाजप आणि शिवसेना (उबाठा) प्रत्येकी सव्वा-सव्वा वर्षांच्या दोन टर्ममध्ये वाटून घेणार,
- शिवसेना (उबाठा) चे प्रशांत दानव हे पाच वर्षांसाठी उपमहापौर असतील,
- स्थायी समितीचे अध्यक्षपद पहिल्या आणि चौथ्या वर्षी शिवसेना (उबाठा) कडे राहणार आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे वक्तव्य
महापौर निवडीवरून सुरू असलेल्या चर्चांदरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी प्रतिक्रिया दिली होती. चंद्रपूरमध्ये काँग्रेसकडे ३२ सदस्य असून बहुमतासाठी दोन सदस्यांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले होते. शिवसेना (उबाठा) आणि वंचित बहुजन आघाडीने गट स्थापन केला असून, त्यांच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
उद्धव ठाकरेंची भूमिका चर्चेत
भाजपसोबत कोणत्याही परिस्थितीत युती नको, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी स्थानिक नेत्यांना दिल्याचे सांगितले जात असताना चंद्रपूरमध्ये मात्र भाजप–शिवसेना (उबाठा) युती जाहीर झाली आहे. त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरे या निर्णयावर नेमकी काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


