नागपुरात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी रणनीती, कार्यपद्धती आणि प्रचारयंत्रणेवर चर्चा केली. 

नागपूर: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रविवारी नागपूरच्या रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्वपूर्ण समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तसेच विदर्भातील प्रमुख आमदार आणि नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

भाजपने या बैठकीत आगामी निवडणुकांसाठीची रणनीती, कार्यपद्धती आणि प्रचारयंत्रणेचा सविस्तर रोडमॅप संघासमोर मांडला. त्यानंतर संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी भाजप नेत्यांना सामाजिक समन्वय, जनतेशी अधिक सुसंवाद, आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर भर देण्याचा सल्ला दिला.

बैठकीस विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, राम हरकरे आणि कार्यवाह अतुल मोघे यांच्यासह संघाचे इतर वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. भाजपकडून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री पंकज भोयर, अशोक उईके, आकाश फुंडकर, राजू तोडसाम, समीर कुणावार, डॉ. नरोटी, सुमित वानखेडे, संजय कुटे, किशोर जोरगेवार, सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहीर यांसारखे नेते सहभागी झाले.

कार्यकर्त्यांवर लक्ष केंद्रित, अपूर्ण टास्कवर चर्चा

बैठकीत काही कार्यकर्त्यांनी अद्याप पूर्ण न केलेल्या जबाबदाऱ्यांवर फडणवीस आणि गडकरी यांनी थेट भाष्य केले. अपूर्ण टास्क पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच, येत्या तीन महिन्यांत कोणत्या मुद्द्यांवर भर द्यायचा हे स्पष्ट करण्यात आले. सरकारच्या विविध योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक तत्परतेने काम करावे, अशी सूचना करण्यात आली.

सकाळपासून सायंकाळपर्यंत मॅरेथॉन बैठक

ही समन्वय बैठक सकाळी ८.३० वाजता सुरू झाली आणि सायंकाळी ४.५० वाजेपर्यंत सुरू होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी चार तासांहून अधिक वेळ बैठक घेतली, तर नितीन गडकरी सुमारे दीड तास उपस्थित होते. या काळात दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांना धोरणात्मक मार्गदर्शन केले.

समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचण्यावर भर

संघाच्या वतीने भाजपला स्पष्ट संदेश देण्यात आला की, समाजातील सर्व घटकांपर्यंत विशेषतः दुर्लक्षित आणि उपेक्षित वर्गांपर्यंत पोहोचण्याचे काम अधिक प्रभावीपणे व्हावे. सामाजिक समरसता आणि समन्वय यावर भर देत, संघाने भाजपने निवडणुकीसाठीच्या रणनीतीत सामाजिकदृष्ट्या अधिक समावेशक दृष्टिकोन ठेवावा, असे स्पष्ट केले.

या बैठकीतून भाजपने निवडणुकीपूर्वीचा आपला दिशादर्शक ठरवला असून, संघाच्या मार्गदर्शनाने प्रचार आणि संघटनात्मक कामकाज अधिक प्रभावीपणे राबवले जाणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ही बैठक एक निर्णायक पाऊल ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.