सार
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. वाल्मिक कराड महाराष्ट्रात असल्याची माहिती समोर आली असून त्याच्या शोधासाठी सीआयडीची विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
बीड जिल्ह्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे रोज एक नवीन अपडेट समोर येत आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड हा अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा राईट हॅन्ड म्हणून ओळखला जातो. या हत्याकांडाच्या निषेधार्थ बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी या मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली होती.
वाल्मिक कराड महाराष्ट्रामध्येच -
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड हा महाराष्ट्रामध्येच असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्याच्या शोधासाठी सीआयडीने त्यांची विशेष पथके पाठवली असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. ४ टीम वाल्मिकीचा शोध घेत असून तो लवकरच पोलिसांच्या ताब्यात येईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. सीआयडीने या गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी ९ विशेष पथके तैनात केली आहेत.
वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल -
वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार, वाल्मिक कराडचे बँक खाते गोठवण्यात आले आहेत. वाल्मिक कराड नव्हे तर त्याच्या नातेवाईकांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. वाल्मिक कराडच्या पत्नीची सीआयडीकडून चौकशी करण्यात आली. तब्बल दोन तास ही चौकशी सुरु होती.