Ratnagiri Chemical Factory Controversy : इटलीतील एका वादग्रस्त आणि प्रदूषणकारी कंपनीची मशिनरी आता रत्नागिरीतील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत आणण्यात आली आहे. या 'विषारी' मशिनरीमुळे कोकणच्या पर्यावरणाला धोका निर्माण झाल्याचा आरोप होत आहे.
रत्नागिरी : इटलीतील एका शहराला 'विषारी' बनवणारी आणि शेकडो लोकांच्या आरोग्याशी खेळणारी मशिनरी आता महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर धडकली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत सुरू असलेल्या एका केमिकल फॅक्टरीमुळे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली असून, महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.
इटलीचा तो भयानक इतिहास
इटलीतील विसेन्झा (Vicenza) भागात 'मितेनी' (Miteni) नावाची एक कंपनी अनेक वर्षे कार्यरत होती. ही कंपनी फ्लोरोकेमिकल्स बनवायची. २०११ मध्ये वैज्ञानिकांना आढळले की, या कंपनीच्या सांडपाण्यामुळे जमिनीतील पाणी आणि माती प्रचंड प्रदूषित झाली आहे. यात PFAS (Forever Chemicals) या घातक रसायनांचे प्रमाण अतिशय जास्त होते. या प्रदूषणामुळे सुमारे ३.५ लाख लोकांना कर्करोग, हृदयविकार आणि यकृत निकामी होण्यासारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागला. अखेर २०१८ मध्ये ही कंपनी बंद पडली आणि २०२४ मध्ये तिथल्या अधिकाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली.
विसेन्झा ते रत्नागिरी: मशिनरीचा प्रवास
मितेनी कंपनी दिवाळखोरीत निघाल्यानंतर तिची यंत्रसामग्री, पेटंट्स आणि तंत्रज्ञान लिलावात काढण्यात आले. 'लक्ष्मी ऑरगॅनिक'च्या उपकंपनीने हा लिलाव जिंकला. २०२३ च्या सुरुवातीला ही जुनी यंत्रसामग्री मुंबईमार्गे लोटे परशुराम येथे आणली गेली आणि २०२५ पासून तिथे उत्पादनही सुरू झाले आहे.
रोहित पवारांचे गंभीर आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. इटलीतील ३ लाख लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी मशिनरी रत्नागिरीत कशी आली? भारतामध्ये अजूनही PFAS संदर्भात कडक कायदे नाहीत, याचा फायदा घेऊन ही परवानगी कशी दिली गेली? असे सवाल त्यांनी 'X' (ट्विटर) वरून उपस्थित केले आहेत.
कंपनी आणि सरकारचे स्पष्टीकरण
लक्ष्मी ऑरगॅनिक: कंपनीने शेअर बाजार फाइलिंगमध्ये स्पष्ट केले आहे की, त्यांच्या लोटे प्लांटमधून पर्यावरणात कोणतेही घातक सांडपाणी सोडले जात नाही. सर्व कामकाज नियमांनुसार सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
उद्योग मंत्री उदय सामंत नेमकं काय म्हणाले?
माध्यमांतील वृत्तानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (MPCB) अहवाल मागवला आहे. सध्या तिथे PFAS चे उत्पादन होत नसल्याचे प्राथमिक माहितीनुसार सांगण्यात आले असून कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे.
PFAS म्हणजे काय आणि ते घातक का?
PFAS ला 'फॉरेव्हर केमिकल्स' म्हटले जाते कारण ते निसर्गात कधीही नष्ट होत नाहीत. ते मानवी शरीरात साचून राहतात आणि प्रजनन क्षमता कमी करणे, रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम करणे आणि कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारांना निमंत्रण देतात. रत्नागिरीतील हा प्रकल्प खरोखरच सुरक्षित आहे की कोकणच्या पर्यावरणाला इटलीसारखाच धोका निर्माण होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


