Ashok Kharat Case : नाशिकमध्ये अंकशास्त्रज्ञ अशोक खरात यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी होत असून रूपाली पाटील-ठोंबरे यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे.

Ashok Kharat Case : नाशिकमध्ये तथाकथित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली अटक झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. धार्मिक आस्था आणि दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचा विश्वास संपादन करून अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

रूपाली चाकणकर यांच्यावर दबाव वाढला

या प्रकरणात रुपाली चाकणकर यांचा अशोक खरातसोबतचा व्हिडीओ आणि काही फोटो समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक आणि काही नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

रूपाली पाटील-ठोंबरे यांची आक्रमक भूमिका

रूपाली पाटील-ठोंबरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत “राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर फरार...बजाव ताली...” असे लिहित जोरदार टीका केली आहे. त्यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राजीनाम्याची थेट मागणी

पत्रकार परिषदेत रूपाली पाटील-ठोंबरे यांनी स्पष्टपणे सांगितले की, हा विषय कोणत्याही पक्ष किंवा जातीचा नसून महिलांच्या सुरक्षेशी संबंधित आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, ट्रस्टशी संबंध असताना पोलिस कारवाई का झाली नाही? तसेच “58 व्हिडिओ म्हणजे 58 महिलांवर अत्याचार झाला का?” असा सवालही त्यांनी केला.

चाकणकर यांनी पदावर राहिल्यास पुरावे नष्ट होण्याची भीती व्यक्त करत त्यांनी तात्काळ राजीनाम्याची मागणी केली. तसेच राजीनामा न दिल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही दिला.

नेमकं प्रकरण काय?

नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात अशोक खरात याच्याविरोधात 35 वर्षीय महिलेवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपानुसार, त्याने गुंगीचे औषध देऊन महिलेवर अत्याचार केला. 18 मार्च रोजी पहाटे त्याला गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले.

खरातची पार्श्वभूमी

अशोक खरात हा सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असून मर्चंट नेव्हीतून निवृत्त अधिकारी आहे. तो अंकशास्त्रज्ञ आणि कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट म्हणून ओळखला जात होता. अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि व्यावसायिक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जात असत.