सार

Mukhyamantri Warkari Sampradaya Mahamandal : महाराष्ट्र सरकारकडून 'मुख्यमंत्री वारकरी महामंडळा'ची स्थापना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे होणार आहे.

Mukhyamantri Warkari Sampradaya Mahamandal : महाराष्ट्र सरकारकडून 'मुख्यमंत्री वारकरी महामंडळा'ची स्थापना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असेल. या महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवतील अधिकारीची व्सवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात येणार आहे. या मुख्यमंत्री वारकरी महामंडळासाठी 50 कोटींची तरतूद शासनाकडून करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या दिनांक 11 जुलै 2024 रोजी झालेल्या बैठकीत "मुख्यमंत्री वारकरी महामंडळ" स्थापन करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी राज्य सरकारकडून याबाबत अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

"आषाढी वारी" म्हणजे आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रातील वारकरी भक्तांनी विविध गावांपासून पंढरपूर पर्यंत केलेली सामुदायिक पदयात्रा होय. वारीनिमित्त लाखो वारकरी प्रतिवर्षी पंढरपूर येथे जमतातच, परंतु पंथाची दीक्षा न घेतलेले अनेक विठ्ठलभक्तही येतात. आंध्र-कर्नाटकांतून येणाऱ्यांची संख्याही मोठी असते. "वारी" ही आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुध्द एकादशी अशा दोन वेळा होते. त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांची, शेगाव येथून संत गजानन महाराज यांची वारी दरवर्षी निघत असते. तसेच पुढील संतांच्या पालख्या महाराष्ट्रातुन वेगवेगळ्या ठिकाणा वरुन मार्गस्थ होत असतात. संत तुकाराम महाराज (देहू), संत एकनाथ (पैठण), संत सोपानकाका (सासवड), संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर), संत नामदेव (पंढरपूर), संत नरहरी सोनार (पंढरपूर), संत जनार्दनस्वामी (छत्रपती संभाजीनगर), संत जयरामस्वामी (वडगाव), संत शेकूबोवा (शिरसावडी), संत घाडगेबोवा (कोळे), संत तपकिरीबोवा (चिंचगाव), संत मच्छिंद्रनाथ (मच्छिंद्रगड), संत रोहिदास (पंढरपूर), संत संताबाई (पंढरपूर), संत चोखोबा (पंढरपूर), संत चोखोबा बंका (मेहुणपुरा), संत दामाजी (मंगळवेढे), संत रुकमाबाई (कौंडण्यपूर- अमरावती), संत शंकर महाराज (माहुली-अमरावती), संत गोरखनाथ (शिराळा), या दिंडींबरोबर लाखो भाविक पंढरीच्या मार्गावर असतात.

शासन निर्णयात नेमकं काय आहे?

महाराष्ट्र राज्यातील किर्तनकार व वारकऱ्यांना सोयी-सुविधा पुरविण्याकरिता व कल्याणकारी योजना राबविण्याकरीता "मुख्यमंत्री वारकरी महामंडळ" स्थापन करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता प्रदान करण्यात येत आहे. या महामंडळामार्फत पुढील योजना लागू करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे

१. महामंडळाची रचना :

१.१. मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असेल.

१.२. महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची "व्यवस्थापकीय संचालक" म्हणून नियुक्ती करण्यात येईल.

१.३. मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे भागभांडवल रू.५० कोटी इतके असेल.

२. प्रस्तावित महामंडळाचे कार्य :

शेकडो वर्षांपासून पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची पायी दिंडीच्या माध्यमातून "वारी" करण्याची पवित्र परंपरा महाराष्ट्रात आहे. सर्व तिर्थक्षेत्रांचा विकास, किर्तनकार व वारकऱ्यांना अन्न, निवारा, सुरक्षा, वैद्यकीय मदत, विमा कवच, पायाभूत सुविधा इ. सोयी-सुविधा पुरविण्याकरिता व कल्याणकारी योजना राबविण्याकरीता "मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या महामंडळामार्फत वारकरी, किर्तनकार, तीर्थक्षेत्रांसाठी सोयी-सुविधा पुरविण्याबाबत कार्य करण्यात येईल.

३. महामंडळाच्या प्रस्तावित योजना :

३.१. महाराष्ट्र राज्यातील वारकरी संप्रदायाच्या अडीअडचणी, प्रश्न सोडवणे.

३.२. सर्व पालखी सोहळ्यांच्या मार्गांची सुधारणा करणे, स्वच्छता, आरोग्य, निवारा व सुविधा यासाठी दरवर्षी आर्थिक तरतूद करुन नियोजन करण्यात येईल.

३.३. आषाढी व कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षा, विमा संरक्षण कवच देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.

३.४. वारकरी भजनी मंडळाला भजन व किर्तन साहित्याकरिता (टाळ, मृदंग, विणा, इ.) अनुदान देण्याची कार्यवाही करण्यात येईल.

३.५. किर्तनकारांना आरोग्य विमा, मानधन सन्मान योजना राबविण्यात येईल.

३.६. आषाढी व कार्तिकी वारीसाठी दिंड्याना दरवर्षी सानुग्रह अनुदान देण्यात येईल.

३.७. पंढरपुर, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड, पिंपळनेर, त्र्यंबकेश्वर, पैठण, कोल्हापूर संस्थान, शेगाव, तारकेश्वर, भगवानगड, अगस्तऋषी, संत सावतामाळी समाज मंदीर, अरण ता. माढा जि. सोलापूर व इतरही तिर्थक्षेत्रांचा विकास करण्यात येईल.

३.८. चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी व इतर नद्या प्रदूषण मुक्त करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.

३.९. परंपरेने महिन्याची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृध्दापकाळामध्ये "वारकरी पेंशन" योजना सुरु करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. ३.१०. संपूर्ण भारतभर वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारे 'पूज्य सदगुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, आळंदी' या संस्थेत विद्यार्थ्यांना फी नाही व शिक्षकांना वेतन नाही आणि कोणतेही शासकीय अनुदान नाही. या व अशा इतर संस्थांना किर्तनभवन, शिक्षण वर्ग, भजन हॉल या विकासकामांकरिता भरीव निधी देण्याबाबतची कार्यवाही महामंडळाकडून करण्यात येईल .

३.११ संत गोरोबा काका सेवा मंडळ तेर परिसर, ता.जि. उस्मानाबाद (धाराशिव) येथे १५ हजार स्केअर फुटाचा सभामंडपासाठी निधी मंजूर करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.

३.१२ श्री संत मुक्ताबाई संस्थान, मुक्ताईनगर पालखी मार्ग व समाधी स्थळ याकरिता मंजूर झालेल्या निधीबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल.

३.१३ श्री क्षेत्र पंढरपूर येथे चंद्रभागा नदीच्या दोन्ही बाजूने घाट विकसित करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

३.१४ श्री क्षेत्र पंढरपूर येथे म्हसोबा मंदिर ते विप्रदत्त घाटापर्यंत चंद्रभागेवरती पादचारी मार्ग अथवा झुलता पूल तयार करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

३.१५ श्री क्षेत्र पंढरपूर येथील ६५ एकरमध्ये काँक्रीटीकरण व दिंड्यांसाठी मोठे वेगवेगळे कक्ष उभारावे, त्यास नाममात्र शुल्क आकारण्यात यावेत. या जागेव्यतिरिक्त पालख्या / वाऱ्यांच्या पंढरपूरकडे येणा-या सर्व मार्गांवर पंढरपूर शहराजवळ वारकऱ्यांच्या दिंड्यांसाठी, फडांसाठी तसेच त्यांच्या सोयीसुविधांसाठी भूसंपादन करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.

३.१६ सर्व पालखी सोहळ्यांचे मार्ग व्यवस्थित करुन प्रतिवर्षी त्याकरिता सर्व व्यवस्था करण्याकरिता कायमस्वरुपी निधी मंजूर करण्यात येईल.

३.१७ आषाढी व कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकरी/भाविक तसेच दिंडींच्या वाहनांना टोल माफ करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल.

३.१८ महिला वारकऱ्यांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था, प्रसाधन गृहे, वस्त्रांतर व इतर अनुषंगिक सोयी सुविधा पुरविण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.

४. महामंडळाकरीता आवश्यक पदे (आकृतीबंध) व आर्थिक तरतूद, स्वतंत्र लेखाशिर्ष याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून स्वतंत्ररित्या कार्यवाही करण्यात येईल. सद्यः स्थितीत महामंडळ कार्यान्वित करण्याचा खर्च विभागाच्या ज्येष्ठ नागरिक योजनांच्या लेखाशिर्षामधून करण्यात येईल. महामंडळाची कार्य नियमावली आणि तद्अनुषंगिक इतर आदेश यथावकाश निर्गमित करण्यात येतील.

आणखी वाचा

Ashadhi Wari 2024 : जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, आषाढीला व्हीआयपी दर्शन बंद करुन महापूजेच्यावेळी पासेस कमी करणार