केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माधवबाग येथे झालेल्या कार्यक्रमात मोदी सरकारच्या कामगिरीचं कौतुक केलं. ऑपरेशन सिंदूरचं उदाहरण देत ते म्हणाले की, भारतीय संस्कृतीचा अभिमान आता जागतिक स्तरावर पोहोचला आहे. 

मुंबई: "काही जण अजूनही विचारतात, मोदींनी काय केलं? त्यांनी भारताला 10व्या क्रमांकावरून 4थ्या क्रमांकावर आणलं," अशा ठाम शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. माधवबाग येथील लक्ष्मी-नारायण मंदिराच्या 150 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

ऑपरेशन सिंदूरवर ठाम मत

“ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एक चुटकी सिंदूरचं महत्त्व जगभर दाखवलं गेलं. 'सिंदूर' हा शब्द गुगलवर तब्बल 10 कोटी वेळा सर्च करण्यात आला. हेच दाखवतं की भारतीय संस्कृतीचा अभिमान आता जागतिक स्तरावर पोहोचला आहे. तरीही काहींना आजही याचं महत्त्व समजलेलं नाही,” असा घणाघात शाह यांनी केला.

"मोदींनी देशाचा आत्मविश्वास परत दिला"

अमित शाह म्हणाले, "मोदी सरकारच्या नेतृत्वात भारताने आत्मसन्मान आणि सुरक्षा यामध्ये मोठी मजल मारली आहे. आतंकवाद्यांना सडेतोड उत्तर, काशी विश्वनाथ कॉरिडोर, भगवान राम मंदिर, योगा आणि आयुर्वेदाचा जागतिक प्रसार — हे सर्व बदल मोदींमुळे शक्य झाले. आज भारताची ओळख 'निव्वळ एक देश' एवढी मर्यादित राहिलेली नाही, तर 'एक शक्तिशाली संस्कृती' म्हणून उभी राहिली आहे."

पासपोर्टचं महत्त्वही वाढलं

“फ्रान्समधील एका राजनयिकाने मला सांगितलं, ‘आज भारतीय पासपोर्टची किंमत वाढली आहे. जगभरात भारताला वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं.’ हे परिवर्तन फक्त नेतृत्वामुळे शक्य झालं आहे,” असं शाह यांनी सांगितलं.

माधवबाग संस्थेचं कौतुक

कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी माधवबाग संस्थेच्या 150 वर्षांच्या योगदानाचं विशेष कौतुक केलं. “1875 मध्ये इंग्रजांच्या राजवटीत मुंबईच्या मध्यभागी एक धार्मिक संस्था उभी करणे सोपं नव्हतं. आजही ही संस्था गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करते,” असं म्हणत त्यांनी माधवबागला ‘गुजराती-मारवाडी संस्कृतीचं केंद्र’ बनवण्याचा प्रस्ताव मांडला.

अमित शाह यांचं भाषण केवळ राजकीय नसून भारतीय संस्कृतीचा अभिमान आणि आधुनिक भारताचा आत्मविश्वास यांचा संगम होता. ‘एक चुटकी सिंदूर’ पासून ते ग्लोबल इंडिया पर्यंतचा प्रवास त्यांनी प्रभावीपणे मांडला.