Ajit Pawar Baramatikar Warning : बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहतूक नियम मोडणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. माझा नातेवाईक असला तरी टायरमध्ये घालून झोडा, असे आदेश त्यांनी पोलिसांना दिले.
बारामती : मुलाखतीतून किंवा सभांतून आपल्या बिनधास्त आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा नियमभंग करणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना कोणतीही गय दिली जाणार नाही, असं ठणकावून सांगत त्यांनी पोलिसांना असा आदेश दिला की, "माझा नातेवाईक असो तरी टायरमध्ये घालून झोडा!"
काय आहे प्रकरण?
शनिवारी बारामतीत सावित्री हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना अजित पवार यांना शहरातील बेशिस्त वाहतूक आणि रस्त्यावरील गोंधळाविषयी बोलावं लागलं. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, "जो नियम तोडतो, तो कितीही मोठ्या घरचा असो त्याला दणका द्या!" "कोणी मोटारसायकलवरून रॉंग साईडने जात असेल, बेशिस्तपणा करत असेल, तर त्या व्यक्तीला टायरमध्ये अडकवून अशी झोडा की दहा पिढ्या आठवतील," असं अजितदादांनी ठणकावून सांगितलं.
नियम सर्वांसाठी सारखे!
"नियम अजित पवारसाठी वेगळे आणि इतरांसाठी वेगळे नाहीत. मी स्वत:लाही नियमात बांधतो आणि माझ्या नातेवाईकांनाही," असं स्पष्ट करत त्यांनी प्रशासन आणि पोलिसांना कोणताही दबाव न घेता कारवाई करण्यास सांगितलं.
मोकाट जनावरांवरूनही इशारा
फक्त वाहतूकच नाही, तर शहरातील मोकाट जनावरे, रस्त्यावरील कचरा, आणि गोंधळ यावरही अजित पवारांनी कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली. "जनावरे रस्त्यावर फिरू नयेत. ऐकत नसाल, तर बाजार दाखवतो. मालकांनी जनावरे घरात बांधा, नाहीतर तुमच्यावरच गुन्हे दाखल होतील!" अशी तीव्र भाषा वापरत त्यांनी नागरिकांना जबाबदारीने वागण्याचा इशारा दिला.
बारामतीचा विकास म्हणजे शिस्त आणि स्वच्छता, असं अजित पवार यांचं स्पष्ट मत आहे. त्यांची ही भूमिका सामान्य जनतेच्या हितासाठी असून, "माझा नातेवाईक असला तरी नियम तोडला तर शिक्षा अटळ!" हा त्यांचा संदेश बारामतीकरांपर्यंत पोहोचला आहे.


