Rohit Pawar : ईडीच्या कारवाईला रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांचा कट असल्याचा आरोप केला आहे. कन्नड साखर कारखाना खरेदी प्रकरणात दाखल झालेल्या पुरवणी आरोपपत्रानंतर त्यांनी आपली बाजू मांडली आणि न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार व्यक्त केला.
पुणे : "ईडीच्या माध्यमातून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे," असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. "आमचे अनेक सहकारी सत्तेच्या लालसेने पळून गेले. त्यांनी लाचारी स्वीकारली, पण आम्ही तसे नाही," असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला. कन्नड साखर कारखाना खरेदीप्रकरणी दाखल झालेल्या पुरवणी आरोपपत्रानंतर, रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. त्यांनी स्पष्ट केलं की, या प्रकरणाची याआधीही चौकशी झाली होती, परंतु त्यामध्ये त्यांचं नाव कुठेही नव्हतं.
"गुन्हे दाखल होते ते आज सत्तेत आहेत"
ईडीने ज्यांच्याविरोधात कारवाई केली होती, त्या ९७ पैकी अनेक नेते आता शिंदे गट, भाजप किंवा अजित पवार यांच्या सोबत आहेत. त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई होत नसल्याचं रोहित पवारांनी अधोरेखित केलं.
न्यायालयीन लढाईला सज्ज
“आता ही लढाई न्यायालयात लढावी लागेल, आणि मला न्याय मिळेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. “सत्र न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत आम्ही ही लढाई लढणार. आम्ही घाबरणारे नाही. आम्ही मराठी आहोत दिल्लीसमोर झुकणारे नाही,” असे रोहित पवार यांनी ठामपणे सांगितले.
“फडणवीस हुशार नेते आहेत, पण...”
यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही उल्लेख केला. “सत्तेसाठी ते उदारमतवादी भूमिका घेतात. पण नंतर ‘चाणक्यनीती’ वापरून मित्रपक्षच संपवतात. ते अतिशय हुशार नेते आहेत,” असा उल्लेख त्यांनी केला.


