Ajit Pawar : सोलापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका महिला आयपीएस अधिकारी, पोलिस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांना फोनवरून धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अवैध मुरूम उत्खननाच्या कारवाई दरम्यान झालेल्या या घटनेमुळे वाद निर्माण झाला आहे.

सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार एका वादामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सोलापूरमधील एका महिला आयपीएस अधिकारी, पोलिस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांच्यासोबत झालेल्या त्यांच्या संभाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवार अंजली कृष्णा यांना फोनवरून दम देताना दिसत आहेत, ज्यामुळे विरोधक त्यांच्यावर जोरदार टीका करत आहेत.

दरम्यान, या प्रकरणानंतर अजित पवार यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता.

आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे.

मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे.

हा सगळा प्रकार दोन दिवसांपूर्वी माढा तालुक्यातील कुर्डू गावात घडला, जिथे अवैध मुरूम उत्खननाची तक्रार दाखल झाली होती. तक्रारीनंतर अंजली कृष्णा त्यांच्या टीमसह घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली, पण त्यावेळी काही लोकांनी लाठ्या-काठ्या घेऊन त्यांना अडवले आणि दमदाटी केली.

या घटनेदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक स्थानिक कार्यकर्ता, बाबा जगताप, याने थेट अजित पवार यांना फोन केला. त्यानंतर त्याने तो फोन अंजली कृष्णा यांच्याकडे दिला. फोनवर अजित पवार यांनी अंजली कृष्णा यांना ही कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. मात्र, अंजली कृष्णा यांनी त्यांना सांगितले की त्यांनी हीच गोष्ट त्यांच्या वैयक्तिक फोनवर कॉल करून सांगावी, जेणेकरून त्यांना ते अधिकृत वाटेल.

हे ऐकून अजित पवार चांगलेच संतापले आणि त्यांनी अंजली कृष्णा यांना थेट धमकी दिली. त्यांनी म्हटले, "मी तुझ्यावर डायरेक्ट अॅक्शन घेणार." एवढंच नाही, तर त्यांनी थेट व्हिडियो कॉल करून आपला चेहरा दाखवला आणि विचारले, “तुझी एवढी हिंमत?”

Scroll to load tweet…

एका वृत्तवाहिनीनुसार, बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठी आणि इतर अधिकाऱ्यांना गुंडांनी धमकावून थांबवले. विशेष म्हणजे, या गुंडांनीच अजित पवारांना फोन करून मदत मागितली. अजित पवारांनी गुंडांना झापण्याऐवजी, कर्तव्यावर असलेल्या प्रामाणिक अधिकाऱ्यालाच दम दिला.

या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, अजित पवारांनी माफी मागावी अशी जोरदार मागणी केली जात आहे. लोकशाहीत लोकप्रतिनिधींनी कायद्याचे पालन करणाऱ्या अधिकाऱ्यांचा आदर करणे अपेक्षित आहे, मात्र या प्रकरणात थेट उपमुख्यमंत्र्यांनीच एका महिला अधिकाऱ्याला धमकावल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.