पुण्यातील बावधन परिसरात वाढदिवसाच्या पार्टीत फटाक्यांऐवजी बंदूकीतून हवेत दोन राउंड फायरिंग करण्यात आले. आरोपी दिनेश सिंह याला पोलिसांनी अटक केली असून त्याचे परवाना असलेले पिस्तूल जप्त केले आहे.

पुण्यात कधी काय घडेल सांगता येत नाही. आपण अशा अनेक गोष्टी ऐकत असतो. वाढदिवसाला वाजवायला फटाके नसल्यामुळे बंदुकीतील दोन राउंड फायर करून सेलिब्रेशन करण्यात आले. पुण्याच्या बावधन परिसरातील वृंदावन फार्म हाऊस सुसगाव येथे ही घटना घडली आहे. दोन राउंड फायर करून मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

आरोपीला पोलिसांनी केली अटक 

कुमार खळदकर यांचा वाढदिवस सुसगाव येथील वृंदावन फार्म हाऊस येथे साजरा करण्यात आला. यावेळी त्या ठिकाणी आरोपी दिनेश सिंह हा मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आला होता. न्यावेळी तिथं आल्यानंतर त्याला फटाके नसल्याचं कळलं, त्यानं खिशातून बंदूक काढून दोन फायर हवेत झाडले. या प्रकरणामध्ये आरोपी दिनेश सिंग याला पोलिसांनी अटक केली आहे.

परवाना असलेले पिस्तूल केलं जप्त 

पोलिसांनी यावेळी दिनेश सिंग यांच्याकडे परवाना असलेले पिस्तूल जप्त केलं आहे. सदर घटना ही ८ जुलै रोजी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वृदांवन फार्म हाऊसवर एक केअर टेकर राहतो. त्यानं आम्हाला माहिती दिली आणि मग आम्ही तिथं जाऊन पोहचलो. कुमार खळदकर यांच्या वाढदिवसाची पार्टी असल्यामुळे तिथं खाजगी लोकांसाठी पार्टी ठेवण्यात आली होती.

यावेळी मित्राच्या वाढदिवसाला वाजवायला फटाके नसल्यामुळे दिनेश सिंग याने स्वतःकडील बंदूक काढली आणि हवेत गोळीबार केला. येथे उपस्थित असणाऱ्या लोकांपुढे त्यानं हवेत दोन राऊंड फायरिंग केली. यावेळी आजूबाजूला या दोन राऊंडचे आवाज घुमले. पण रात्री शांतता असल्यामुळे आवाज कुठं झाला ते लक्षात आलं नाही.